पाच दशकांच्या तपस्येतून साकारलेली शोभा पत्की यांची अमूल्य चित्रसंपदा मंगळवारी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. सप्टेंबरमध्ये जहाँगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी तयारी सुरू असताना या आगीमध्ये पत्की यांची २५ चित्रे जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे सकाळी साडेअकराच्या सुमारास ही आग लागली. मात्र, पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्यामध्ये यश मिळाल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्याची वेळ आली नाही.
मयूर कॉलनी येथील नवकेतन सोसायटी येथे शोभा पत्की यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या आवारातील एका खोलीमध्ये त्यांचा स्टुडिओ आहे. सकाळपासून वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर शोभा पत्की बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर नवी कलाकृती चितारण्याचे काम करीत होत्या. त्या वेळी घरामध्ये त्या एकटय़ाच होत्या. अकराच्या सुमारास वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर काही तरी जळाल्याचा वास त्यांना आला. कोणी तरी कचरा जाळला असेल असे समजून त्या चित्राचे काम करण्यात गुंग झाल्या. मात्र, नंतर तुमच्याकडे आग लागली आहे, असे सांगत शेजाऱ्यांनी आरडाओरड करीत दरवाजा ठोठावला तेव्हा त्या बंगल्याच्या आवारात आल्या. शेजाऱ्यांच्या मदतीने पाण्याचा फवारा मारून त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीमध्ये त्यांची मौल्यवान २५ चित्रे जळून खाक झाली.
गेली पाच दशके चित्रकलेची साधना करणाऱ्या शोभा पत्की यांचे मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरी येथे ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत मागोवा (रेट्रोस्पेक्टिव्ह) प्रदर्शन भरणार आहे. वेगवेगळ्या शैलीमध्ये आणि विविध विषय हाताळणारी २५ चित्रे त्यांनी या आग लागलेल्या खोलीमध्ये ठेवली होती. यापैकी काही चित्रे मुंबई येथील प्रदर्शनामध्ये मांडण्याचा माझा मनोदय होता. कल्पकता आणि नावीन्य असलेली ही चित्रे आता कलारसिकांना पाहता येणार नाहीत याचे दु:ख असल्याची भावना पत्की यांनी व्यक्त केली. या चित्रांचा विमा उतरवलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मोडला नाही कणा!
आगीमध्ये माझी मौल्यवान चित्रे जळून खाक झाली असली, तरी माझा कणा मोडलेला नाही. वाइटातून चांगले घडते असे म्हणतात. त्याप्रमाणे नव्याने कलाविष्कार करण्याची मनीषा शोभा पत्की यांनी व्यक्त केली. जुनी पेंटिंग्ज गेली याचा धक्का जरूर बसला आहे. पण, त्याचे दु:ख करीत बसण्यापेक्षा नव्या उमेदीने चित्रांची निर्मिती करून रसिकांना चांगल्या कलाकृतींचे दर्शन घडवेन. माझ्या हातामध्ये दीड महिना आहे. या संकटाचे रूपांतर संधीमध्ये करण्याची धमक ७० व्या वर्षीही माझ्यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा