पुण्यातील गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. मागील काही दिवसांमध्ये विविध गुन्हेगारी घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे एका घटनेमुळे हादरले आहे. शहरातील बिबवेवाडी परिसरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणारी आणि कबडीपट्टू असलेल्या मुलीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. हृषिकेश भागवत असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

     या घटनेबद्दल पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावासाठी आली होती. तेव्हा  हृषिकेश हा त्याच्या मित्रा सोबत दुचाकीवरून तिथे आला आणि काही समजण्याच्या आत त्याने कोयत्याने आणि चाकूने तिच्यावर  वार  केले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित  असलेल्या त्या मुलीच्या मैत्रिणींना धमकावून पळून लावले आणि तो देखील घटनास्थळावरून पसार झाला.

यानंतर जखमी अवस्थेतील त्या मुलीला  रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र  तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच या घटनास्थळी आम्हाला पिस्तूल देखील आढळून आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – पुण्यात कबड्डी खेळताना विद्यार्थिनीची कोयत्याने वार करुन हत्या झाल्याने अजित पवार संतापले, म्हणाले…

“काल सायंकाळच्या सुमारास मयत मुलगी कबड्डीचा सरावासाठी यश लॉन्स येथील परिसरात गेली होती.तेव्हा मुख्य आरोपी सह चौघे जण दुचाकीवरून तिथे गेले. मुलीस बाजूला घेऊन तिच्यावर कोयत्याने आणि चाकूने वार केले.या घटनेत तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासात मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात यश आले आहे. आरोपी मयत मुलीच्या घराशेजारी पाच वर्ष राहत होता.मात्र साधारण वर्षभरापूर्वी दुसरीकडे राहण्यास गेला होता. आरोपी मुलीच्या नात्यातील आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे”, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

तर फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात यावा अशी मागणी मुलीच्या मामांनी केली आहे. “तीन महिन्यापूर्वी मुलीस त्रास दिला होता.तेव्हा मी त्याला समज दिल्यानंतर तो शांत झाला होता. मात्र काल त्याने तिच्यावर वार करून खून केला.आरोपीला अडविण्याचा प्रयत्न तेथील मुलीनी केला.मात्र तो वार करीत राहिला. ४४ वार तिच्यावर त्याने केला आहेत.यामुळे या आरोपीचे कोणीही केस लढू नये आणि फास्ट ट्रॅक कोर्टामधून लवकरात लवकर न्याय मिळावा”, अशी मागणी मुलीच्या मामांनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking incident once again in pune girl stabbed to death msr 87 svk
Show comments