पुणे : डीआरडीओचा संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाजमाध्यमात केलेल्या संवादाची प्रत राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकरने झाराबरोबर झालेल्या चर्चेत ब्रह्मोसबरोबर अग्नि आणि रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. कुरुलकरने झारा दासगुप्ताला भेटून ब्रह्मोसची संवेदनशील माहिती देण्याची तयारी दर्शविली होती, असे एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.
एटीएसने कुरुलकरविरुद्ध विशेष न्यायालयात एक हजार ८३७ पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल केले. सहा खंडांतील आरोपपत्रात एटीएसने कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाजमाध्यमात केलेल्या संवादाची प्रत जोडली आहे. तसेच साक्षीदारांची यादीही जोडण्यात आली आहे. कुरुलकरला गोपनीय कामकाज, सुरक्षा नियमावलीची माहिती होती. डीआरडीओने विकसित केलेल्या प्रकल्पांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी हेर झारा हिला दिली.
शत्रूराष्ट्राला संवेदनशील गोपनीय माहिती दिल्यास देशाच्या सुरक्षितेतला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला पुरविणे गंभीर गुन्हा आहे, याची जाणीव कुरुलकरला होती. कुरुलकरने सुरक्षाविषयक नियमावलीचे उल्लंघन करून शत्रूराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे. त्याच्या विरोधात शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ (१) नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुरुलकरला मधुमोहजालात अडकविणारी झारा दासगुप्ता हिला या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. याबाबतचे पुरावे एटीएसने आरोपपत्रात जोडले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील गुप्तहेर झारा दासगुप्ता नावाने कुरुलकर संवाद साधत होता. समाजमाध्यमात झारा दासगुप्ताच्या नावाने बनावट खाते उघडल्याचा संशय आहे.
पाकिस्तानी हेर झाराशी संवाद साधताना कुरुलकर तिला ‘बेब’ असे म्हणायचा. झाराने विचारले, ब्रह्मोस हे तुमचे संशोधन आहे का, असे विचारल्यावर डॉ. कुरुलकर म्हणाला, ‘‘माझ्याकडे सर्व ब्रह्मोस आवृत्तींवर काही प्रारंभिक डिझाइन्स आहेत.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘बेबी हे एअर लाँच व्हर्जन ना? सुखोई ३० वर लागेल ना? आपण आधीपण यावर चर्चा केलीय.’’ त्याला डॉ. कुरुलकरने ‘हो’ असे उत्तर दिले असून, पुढे त्याने ‘आमच्याकडे आता सर्व चार व्हर्जन आहेत,’ अशी माहिती दिली. ही माहिती तुला मेलवर पाठवणे शक्य होणार नाही. तू मला प्रत्यक्ष भेट. मी तुला ब्रह्मोसची माहिती देतो, असे कुरुलकर झाराला म्हणाला.