Pune Police Bharati Viral Video : राज्यात बेरोजगारीचं विदारक चित्र आहे. शिक्षणाच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी अर्ज भरून बेरोजगार आपल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवतात. त्यामुळे सरकारी नोकरी असो वा इतर कोणत्याही ठिकणची भरती प्रक्रिया असो, तिथे अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या हजारांच्यावर असते. अनेकदा १००-१५० जागांसाठी ५० हजार उमेदवार अर्ज करत असल्याचंही समोर आलं आहे. तसंच, गट क साठी उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केल्याचंही स्पष्ट झालंय. आज सकाळपासून एक व्हिडिओ प्रचडं व्हायरल होतोय. त्यामुळे बरोजगारीचं हे विदारक दृश्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. पुण्यातील पोलीस भरतीदरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

आज बुधवार १९ मार्च रोजी पुण्यातीस शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पोलीस भरती होती. २९ जानेवारीपासून ही पोलीस भरती सुरू झाली असून आजपासून महिला उमेदवारांसाठी भरतप्रक्रिया सुरू झाली आहे. पुण्यात ५३१ कारागृह महिला पोलीस जागांसाठी भरती सुरू आहे. याकरता तीन हजारांहून अधिक महिला उमेदवार भरतीप्रक्रियेसाठी आल्या होत्या. परंतु, यावेळी गेट तुटून पडला. त्यामुळे गेटजवळ उभ्या असलेल्या महिला उमेदवार पडल्या. परिणामी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही महिला उमेदवार जखमी झाल्याचंही म्हटलं जातंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. येथे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचा दावा केला जातोय. मात्र, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी हा देवा फेटाळून लावला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

व्हिडिओत काय होतं?

मुख्यालयाच्या गेटवर महिला उमेदवारांची गर्दी जमली होती. पहाटे चार वाजता हा गेट तुटला. गेट तुटताच क्षणी महिला उमेदवारांनी आतल्या दिशेने धाव घेतली. महिला उमेदवारांबरोबर त्यांचे नातेवाईक किंवा पालकही होते, त्यामुळे नेहमीपेक्षा गर्दी जास्त जमली होती. पुढील पाच ते दहा मिनिटे येथे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ही गर्दी नियंत्रणात आणली गेली.

पोलीस काय म्हणाले?

याबाबत पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे म्हणाले, “दीड महिन्यांपासून म्हणजेच २९ जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला ५००-१०० उमेदवारांना बोलावलं होतं. त्यानंतर १५०० उमेदवारांना बोलावण्यात आलं. आता १५०० विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी सुरू आहे. अत्यंत शांतपणे येथे प्रक्रिया सुरू आहे. आजपासून महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे पालक आले होते. त्यामुळे साडेचार वाजता गर्दी जमली होती. पण चेंगराचेंगरी झालेली नाही. साडेचार वाजता उमेदवारांना आत घेण्यात आलं आणि शिस्तीत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.”

Story img Loader