Pune Rape Case Updates : सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीने स्वारगेट येथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला जीवेमारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी आता पोलिसांनी कार्यवाही करायला सुरुवात केली असून आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. दत्तात्रय गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) असं या आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या शोधासाठी १३ पथके तैनात करण्यात आली असून त्याची मैत्रिण आणि आई-वडिलांचीही चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, त्याच्या मैत्रिणीने चौकशीत धक्कादायक माहिती दिली.

गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची पोलिसांनी चौकशी पोलिसांनी बुधवारी रात्री केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून गाडेचा शोध घेण्यात येत आहे. गाडेचे आई-वडील आणि भावाची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांना चौकशीसाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मैत्रीण चौकशीसाठी ताब्यात

गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली. “तो माझ्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे नंबर मागायचा. त्याने अनेक तरुणींना त्रास दिला आहे”, अशी माहिती तिने दिली. आता यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

महिला आयोगाने घेतली दखल

दरम्यान, स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गंभीर दखल घेतली. रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा. आरोपीला गजाआड करण्यात यावे, तसेच बलात्कार प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास, पीडित तरुणीची फिर्यादीची प्रत याबाबतचा अहवाल येत्या तीन दिवसात राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर करावा, असे आदेश रहाटकर यांनी दिले आहेत.

ही घटना गंभीर, तसेच वेदनादायी आहे. याप्रकरणाचा तपास योग्य दिशेने करण्यात यावा. पीडित तरुणीला योग्य ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात यावी. तरुणीचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात यावे, तसेच तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आदेश रहाटकर यांनी दिले आहेत.

Story img Loader