राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या कादंबरीवर आधारित ‘रात्र वणव्याची’ या दूरदर्शन मालिकेची निर्मिती होत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यानिमित्ताने मालिकेसाठी प्रथमच दिग्दर्शन करीत असून ५२ भागांच्या या मालिकेच्या चित्रीकरणास  प्रारंभ झाला आहे.
पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये योग्य स्थान मिळविण्यासाठी सामना करणारी नायिका, हे या कादंबरीचे सूत्र असल्याचे नीला सत्यनारायण यांनी सांगितले. प्रशासकीय सेवेत काम करीत असताना आलेल्या अनुभवांनी अस्वस्थ होणारी, त्याचवेळी प्रामाणिक आणि ऋजु वागणुकीने स्वत:ची बाणेदार अशी प्रतिमा निर्माण करणारी ‘अंजली’ ही या कादंबरीची मुख्य व्यक्तिरेखा आहे. कारकिर्दीत येणारे अनुभव आणि सर्वच पातळ्यांवर येणाऱ्या समस्यांवर ती कशी कौशल्याने मात करते याचे दर्शन या मालिकेत घडते, असे सत्यनारायण यांनी सांगितले.
समाजाचा तथाकथित ढोंगीपणा उघडकीस आणावा, या दृष्टिकोनातून मालिकेचा दिग्दर्शक होण्याचे ठरविले असे विक्रम गोखले यांनी सांगितले. ही मालिका पुरुषप्रधान समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत पुरुषाचे सत्तास्थान जेव्हा स्त्रीमुळे डळमळीत होते तेव्हा समाज स्त्रीला वेगळे नियम लावतो. या मालिकेमध्ये कांचन जाधव ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर, राहुल सोलापूरकर, फैय्याज, इला भाटे, श्रीकांत मोघे, शंतनू मोघे, माधव अभ्यंकर, राम कोल्हटकर, योगिनी पोफळे, उमेश दामले, प्रशांत तपस्वी, नितीन धंधुके, चिन्मय पाटसकर, अतुल कासवा, शेखर लोहोकरे यांच्या भूमिका आहेत. मला हवे तसे काम करता येणार असल्याने समाधानी आहे. मी प्रेक्षकशरण दिग्दर्शक नाही. त्यामुळेच हा विषय चित्रपटाऐवजी मालिकेद्वारे सक्षमपणे नेता येईल हा विचार कृतीमध्ये आणत आहे.
स्त्रियांचे सक्षमीकरण हा विषय घेऊन बनविण्यात आलेल्या मालिकेची निर्मिती करताना आनंद होत असल्याची भावना दूरदर्शनचे महासंचालक मुकेश शर्मा यांनी व्यक्त केली. लोकांच्या संवेदनशीलतेमध्ये बदल घडवून आणण्याबरोबरच सध्याच्या राजकीय आणि शासकीय व्यवस्थेचा दृष्टिकोन विशाल करेल, असे सांगून दूरदर्शनचे बजेट कमी असतानाही कलाकार आणि तंत्रज्ञ मालिकेत काम करण्यासाठी तयार झाल्याबद्दल शर्मा यांनी समाधान व्यक्त केले.
 
दूरदर्शन नफ्यामध्ये
समाजकेंद्री कार्यक्रमांची निर्मिती करूनही दूरदर्शन नफ्यामध्ये आहे. गेल्या वर्षी ४६ कोटी रुपये खर्च केला असून दूरदर्शनला ५७ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले असल्याची माहिती, दूरदर्शनचे महासंचालक मुकेश शर्मा यांनी सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा