लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर आता गौरींसाठी नव्या साड्या, अलंकार तसेच मिठाई आणि फराळाचे जिन्नस खरेदीची सुवासिनींची लगबग सुरू झाली आहे. गौरी आवाहन केल्यानंतर सजावट करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीची धामधूम असल्याने बाजारपेठेमध्ये गर्दी झाली आहे.
गणरायाच्या पाठोपाठ घरोघरी माहेरवाशीण गौरींचे शनिवारी (३ सप्टेंबर) आगमन होत आहे. करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. त्यामुळे इच्छा असूनही गीैरीपूजनासाठी सुवासिनींना मोकळेपणाने खरेदी करण्याची संधी मिळाली नव्हती. ती कसर भरून काढत यंदा थाटामाटामध्ये घरोघरी गौरी आवाहनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
कुलाचारानुसार कोणाकडे गौरींचे पितळी, तर कोणाकडे शाडूचे मुखवटे असतात. काही घरांमध्ये गणपतीबरोबर गौरींचे शाडूचे मुखवटे विसर्जित केले जातात. त्यामुळे दरवर्षी नव्याने मुखवट्यांची खरेदी केली जाते. गौरी आगमनाच्या निमित्ताने गृहिणींनी जय्यत तयारी केली असून, पूजा साहित्य, सजावटीचे साहित्य आणि खिरापतीच्या नैवेद्यासह गौरींची आरास करण्यासाठी आवश्यक मिठाई आणि फराळाचे पदार्थ खरेदीसाठी तुळशीबाग-मंडई परिसरात शुक्रवारी गर्दी झाली होती. अर्थार्जन करणाऱ्या महिलांकडून फराळाचे पदार्थ करण्यासाठी अवधी हाताशी नसल्याने बाजारातून पदार्थ खरेदी करण्यावर भर देण्यात आला.
हेही वाचा : पुणे : गणेशोत्सवात मोबाईल चोरणारी कर्नाटकातील टोळी गजाआड ; ८४ मोबाईल संच जप्त
त्यामुळे मिठाईच्या दुकानांमध्ये तसेच घरगुती फराळाचे पदार्थ तयार करून देणाऱ्या महिलांकडे खरेदी करण्यात आली.
गौरींसाठी नव्या साड्या, बांगड्यांसह नावीन्यपूर्ण अलंकार खरेदी करण्यामध्ये सुवासिनी व्यग्र होत्या. पूजेच्या साहित्यामध्ये हळदी-कुंकू, पूजेसाठी लागणारे महावस्त्र, ओटी भरण्यासाठी खण, हार अशा साहित्य खरेदीवर भर देण्यात आला. गौरी आवाहन झाल्यानंतर घरोघरी हळदी-कुंकू कार्यक्रम असतो. गौरींच्या दर्शनासाठी आलेल्या सुवासिनींना द्यावयाची भेटवस्तू आणि तोंड गोड करण्यासाठी मिठाई खरेदी करण्यात आली.
हेही वाचा : तृणधान्ये महागण्याची भीती; लागवड क्षेत्रात घट; तातडीने उपाययोजनांची गरज
गौरी आवाहनासाठी दिवसभराचा मुहूर्त
गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गृहिणींना गौरी आगमनाचे वेध लागतात. शनिवारी (३ सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने रविवारी (४ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. सोमवारी (५ सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर रात्री ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल.