पिंपरी महापालिका आणि प्राधिकरण क्षेत्रात अधिकृत भाजी मंडईंची संख्या कमी असल्यामुळे भाजी विक्रीची दुकाने थेट रस्त्यावरच थाटली जात आहेत. रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभ्या राहिलेल्या भाजीपाला आणि फळ बाजारांमुळे जागोजागी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या व्यावसायिकांमुळे शहराच्या बकालपणात वाढ होत असून भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे अस्वच्छता आणि दरुगधीचाही सामना नागरिकांना करावा लागतो.

अधिकृत भाजी मंडई असतानाही पिंपरी, कृष्णानगरसह शहराच्या बहुतांश भागात भाजी विक्रेते रस्त्यावरच भाजी विकायला बसतात. दैनंदिन गरजांमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या भाजीपाला आणि फळांना मोठय़ा प्रमाणात ग्राहक असतो. त्यामुळे हमखास रोजगार मिळवून देणारी भाजी विक्रीची दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांची संख्या पिंपरी-चिंचवड शहरात झपाटय़ाने वाढत आहे. मात्र या भाजी विक्रेत्यांकडून सर्रास बेकायदेशीर रीत्या रस्त्यांवर किंवा रस्त्यांच्या कडेला भाजी विक्रीची दुकाने थाटली जात आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी सायंकाळी असते. त्यामुळे या काळात वाहतुकीचीही समस्या मोठी असते.

पिंपरी-चिंचवड शहरात आकुर्डी ते चिखली या मार्गावर फळ आणि भाजी विक्रेते रस्त्याच्या कडेने आडव्यातिडव्या पद्धतीने दुकाने थाटतात. भाजी खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक त्यांच्या दुचाक्या रस्त्यावर उभ्या करुन भाजी खरेदी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडते.

असाच प्रकार पिंपरी-चिंचवडमधील चापेकर चौक, आकुर्डी गावठाण, कृष्णानगर, भोसरी, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, डांगे चौक आदी भागात दिसतो. तेथेही रस्त्यावरच खरेदी सुरू असते.

पिंपरी भाजी मंडईमध्ये महापालिकेने भाजी विक्रेत्यांना गाळ्यांचे वाटप केले आहे. मात्र, भाजी विक्रेते मंडईच्या बाहेर रस्त्यावर भाजी विक्री करतात. रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करीत नाही. भाजी मंडईत जाण्याआधी रस्त्यावर बसलेले भाजी विक्रेत दिसतात. त्यामुळे अधिकृत भाजी विक्रेत्यांकडे ग्राहक फिरकत नाहीत. मासुळकर कॉलनीमध्येही महापालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी कट्टे तयार करून दिले आहेत. तिथेही भाजी विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटून भाजी विक्री करताना दिसून येतात. कृष्णानगर पेठ क्रमांक २० मध्ये महापालिकेने भाजी मंडई बांधून दिली आहे. मात्र, भाजी विक्रेते तिथे बसत नसल्यामुळे मंडईला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे तिथे अस्वच्छता आणि दरुगधी निर्माण झाली आहे. शेजारीच प्राधिकरणाच्या वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून भाजी विक्रेत्यांनी अनधिकृत भाजी मंडई सुरू केली आहे. महापालिका आणि प्राधिकरणाकडून शहरामध्ये जेथे गरज आहे अशा ठिकाणी भाजी मंडईंची उभारणी कमी संख्येने केल्यामुळे भाजी विक्रेते रस्त्यावरच दुकाने थाटतात. शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहचली आहे. त्या प्रमाणात भाजी मंडईंची उभारणी करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र शहरामध्ये आहे.