कमीतकमी अवधीत मोठा आशय मांडण्याचे लघुपट हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचे सामथ्र्य ध्यानात घेऊन महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी लघुपट स्पर्धा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक ठेवा उलगडणारे आणि किमान तीन मिनिटे ते दहा मिनिटे या कालावधीतील लघुपट या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फाऊंडेशनतर्फे ८ ते १५ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा लघुपट महोत्सव होणार आहे. नवीन निर्माते, विद्यार्थी यांना कल्पनात्मक आणि सौंदर्यात्मक गुणवत्ता दाखविण्याची संधी देणे ही संकल्पना आहे, अशी माहिती ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांनी बुधवारी दिली.
या स्पर्धेमध्ये नैसर्गिक ठेवा, ऐतिहासिक ठेवा आणि महाराष्ट्राची संस्कृती असे तीन विभाग आहेत. प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या लघुपटासाठी एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या लघुपटासाठी ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या लघुपटासाठी २५ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची १५ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असून, स्पर्धकांनी आपला सहभाग निश्चित करण्यापूर्वी http://www.piffindia.com या संकेतस्थळावर दिलेली सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. लघुपटासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर करता येईल. निवड समितीद्वारे प्रत्येक विभागात दहा अंतिम लघुपट निवडले जाणार असून, रोख पुरस्कार हे ज्युरींच्या निर्णयानुसार प्रदान केले जाणार आहेत, असे जब्बार पटेल यांनी सांगितले.
राज्यात पर्यटनाची झपाटय़ाने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम पर्यटनस्थळांसंदर्भात देशात आणि परदेशातील संभाव्य ठिकाणी माहिती पोहोचविण्यात येणार आहे. सध्याच्या नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा त्यासाठी व्यासपीठ म्हणून उपयोग केला जात आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती प्रभावी ठरत आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी लघुपट स्पर्धा आयोजित केली असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२०-२४४२४५४५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.