ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या प्रकाराचा उपप्रकार असलेल्या बीएफ.७ पासून होणाऱ्या संभाव्य संसर्गाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी वर्धक मात्रेचे लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सर्व स्तरावर करण्यात येत आहे. मात्र, पुणे शहरातील सद्य:स्थिती पहाता लशीला मागणी आहे, पण महापालिकेला लशींचा पुरवठाच नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा- पुणे शहरात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात; मुखपट्टीचा वापर करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे आवाहन
महासाथीचे स्वरूप तीव्र असताना शहरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. साथीची तीव्रता आटोक्यात आल्यानंतर वर्धक मात्रेला असलेली मागणीही कमी झाली. नुकताच जगातील चीन, अमेरिका, ब्राझील, जपान, फ्रान्स अशा काही देशांमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने भारतातही खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, सर्व पात्र नागरिकांनी वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करावे असाा आग्रहही तज्ज्ञ डॉक्टर करत आहेत. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना वर्धक मात्रा घ्यायची असेल तरी ती उपलब्धच नाही, असे चित्र आहे.
हेही वाचा- लष्कराच्या रक्तदान मोहिमेत पुण्यातील केंद्रांवर ७०० युनिट रक्ताचे संकलन
पुणे महापालिकेचे साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, की बीएफ.७ या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा संसर्ग ही जगातील काही देशांमध्ये चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांकडून वर्धक मात्रेची मागणी सुरू झाली आहे. मात्र, सध्या कोव्हॅक्सिनचा साठा पुरेसा असून कोव्हिशिल्डचा साठा पुरेसा नाही. लसीकरण मोहिमेत सर्वाधिक प्रमाणात कोव्हिशिल्डचा वापर झाल्याने त्याची मागणी अधिक आहे, हे स्पष्ट आहे. अद्याप साठा नसल्याने कोव्हिशिल्ड घेतलेल्या लाभार्थींना वर्धक मात्रा देणे अडचणीचे ठरत आहे. ज्या नागरिकांनी पूर्वी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे आणि वर्धक मात्रेचे लसीकरण शिल्लक आहे, त्यांनी तातडीने महापालिका केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहनही डॉ. देवकर यांनी केले आहे.
हेही वाचा- पुणे : लोकसभा अध्यक्षांकडून गिरीश बापट यांच्या तब्येतीची चौकशी
खासगी रुग्णालये लस खरेदीबाबत साशंक
करोना संसर्गाला वेगवान प्रतिबंध करण्यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी पैसे मोजून लस घेण्यास प्राधान्य दिले. मात्र, सरसकट सर्वांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस देण्याचा निर्णय सरकारने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर केल्यानंतर खासगी रुग्णालयात लस विकत घेण्याकडे असलेला नागरिकांचा कल कमी झाला. त्यामुळे खासगी रुग्णालये वर्धक मात्रा लसीकरणासाठी लस खरेदी करण्याबाबत साशंक आहेत.
सर्वांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने जाहीर केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी खरेदी केलेल्या लशींचा साठा वाया गेला. त्यामुळे आता लस खरेदीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनूरकर यांनी दिली.