महापालिकेच्या आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना सध्या औषधांची प्रतीक्षा करावी लागत आहे. औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे नव्याने निधी वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन औषधांची खरेदी होण्यासाठी आणखी किमान १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यताही आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे विमानतळावरील बहुमजली वाहनतळ उद्यापासून कार्यान्वित; हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

गेल्या १५ दिवसांपासून महापालिका आरोग्य विभागाच्या औषध भांडारात औषधांचा साठा संपत आल्याने गरजू रुग्णांना औषधांशिवाय परत जावे लागत आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्थिक क्षमता नसतानाही बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याचे गरजूंकडून सांगण्यात आले आहे. शहरी गरीब योजनेअंतर्गत एक लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दोन लाख रुपयांपर्यंत किमतीचे उपचार मोफत दिले जातात. दरवर्षी सुमारे २०० शहरी गरीब योजनेच्या लाभार्थी कुटुंबांतील प्रत्येकी पाच व्यक्तींना या योजनेचा उपयोग होतो. मात्र, औषध भांडारातील तुटवड्यामुळे गरिबांच्या खिशावर औषध खरेदीचा आर्थिक ताण येत आहे.

हेही वाचा >>>विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा; प्रकृती चिंताजनक – पत्नीचा खुलासा

२०२१-२२ या वर्षात योजनेतील औषधांच्या खरेदीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. २०२२-२३ साठी तो सहा कोटी रुपये एवढा होता. त्याअंतर्गत खरेदी करण्यात आलेली औषधे संपुष्टात आल्याने नव्याने पाच कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर औषध खरेदी पूर्ण करून औषध भांडारात मोफत औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेची दोन मोठी रुग्णालये, ५२ दवाखाने आणि प्रसूतिगृहांमध्ये दररोज उपचारांसाठी येणाऱ्या १० हजार बाह्यरुग्णांना या औषधांचा उपयोग होतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of medicines in pune municipal corporation pune print news amy