केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करताना तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ साहित्य कसे आणि कोठून मिळवायचे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अनेक नवे विषय समाविष्ट करण्यात आल्याने त्यासाठीचे साहित्य इंग्रजीतूनही तातडीने मिळू शकत नसल्याचे मत या परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या पुण्यातील अनेक संस्थाचालकांनी व्यक्त केले.
यूपीएससीच्या संकेतस्थळावर मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदलाची माहिती देण्यात आली आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आता एकूण १८०० गुणांच्या विभागणीत फरक करण्यात आलेला आहे. इंग्रजी आकलन उतारा व निबंधाचा समावेश असलेल्या पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी ३०० गुण (निबंधासाठी २०० व इंग्रजी आकलनाच्या उताऱ्यासाठी १००), दुसरी प्रश्नपत्रिका ही सामान्य अध्ययन भाग १ या विषयाअंतर्गत असून त्यामध्ये भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास, जगाचा भूगोल आणि समाज या सर्वाचा समावेश आहे. सामान्य अध्ययन भाग २ अंतर्गत तिसरी प्रश्नपत्रिका आहे. त्यामध्ये कारभार प्रक्रिया, राज्यघटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांचा समावेश आहे. चौथ्या प्रश्नपत्रिकेत तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, पाचव्या प्रश्नपत्रिकेत नीतिमूल्ये, निष्ठा आणि कल या घटकांचा समावेश आहे. सहावी व सातवी प्रश्नपत्रिका वैकल्पिक विषयाची राहणार आहे. दुसऱ्या प्रश्नपत्रिकेपासून वैकल्पिक विषयांच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत सर्वाना २५० गुण राहणार आहेत.
जुन्या अभ्यासक्रमात दोन वैकल्पिक विषय घेता येत असत. परंतु नवीन अभ्यासक्रमानुसार फक्त एकच वैकल्पिक विषय घेता येईल. शिवाय इतरही काही विचित्र बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतून प्रश्नपत्रिका सोडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. उदाहरणार्थ मुख्य परीक्षेसाठी मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका सोडविणाऱ्यांची संख्या जर २५ पेक्षा कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये प्रश्नपत्रिका सोडविता येणार नाही. त्यांना त्यासाठी इंग्रजी किंवा हिंदीचा आधार घ्यावा लागेल. परीक्षेची गुणवत्ता टिकविण्यासाठी ही अट टाकण्यात आल्याचे लोकसेवा आयोगाचे म्हणणे आहे. ही अट प्रादेशिक भाषांवर अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमध्ये उमटू लागली आहे.
दरम्यान, इतरही काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यात वाङ्मय हा विषय फक्त ज्यांनी वाङ्मयातून पदवी घेतली आहे, त्यांनाच घेता येणार आहे. इतर शाखेतील विद्यार्थी वाङ्मय हा विषय घेऊ शकणार नाहीत. डॉक्टर, अभियंता यांसारख्या विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजीतून प्रश्नपत्रिका सोडविता येईल.
पुण्यातील युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी सांगितले की, पूर्वीच्या अभ्यासक्रमात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा अनिवार्य होत्या, परंतु त्यांत केवळ पात्रतेपुरतेच गुण मिळवावे लागत. या अनिवार्य भाषा नव्या अभ्यासक्रमातून काढून टाकल्या असून प्रश्नपत्रिका क्र. १ मध्ये इंग्रजी आकलनाला शंभर गुण ठेवण्यात आले आहेत. हा घटक मराठीतून शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना भाषा विषय वैकल्पिक म्हणून घ्यायचा आहे त्यांनी तो पदवीपर्यंत शिकला असणे आवश्यक असणार आहे. यामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक विषय म्हणून भाषेचा पर्यायच बंद झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण इंग्रजीतून घेतले आहे त्यांना मुख्य परीक्षा इंग्रजीतूनच द्यावी लागणार आहे, तर मराठी माध्यमात शिकलेल्यांना मुख्य परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांचे पर्याय खुले राहणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांने पदवीपर्यंतचे शिक्षण जरी इंग्रजीतून घेतले असेल तरी मुख्य परीक्षा तो इंग्रजीतून लिहू शकेलच असे नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षा अधिक आव्हानात्मक बनली आहे. माध्यमाचा पर्याय सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवायला हवा होता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी सांगितले की, समितीचा अहवाल गुप्त असून त्याबाबत काही बोलणे उचित होणार नाही. आम्ही अहवाल दिल्यानंतर त्यातील कोणत्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, ते तपासावे लागेल.
नाशिक येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व युनिव्हर्सल फाऊंडेशनचे संचालक डॉ. जी. आर. पाटील यांनी या अटीचा अर्थ प्रादेशिक भाषेतून गुणवत्तावान विद्यार्थी पुढे येत नाहीत, असे यूपीएससीला म्हणावयाचे आहे काय, असा सवाल केला आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून या अटीविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही डॉ. पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ९३७११४९८४२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
यूपीएससीची पूर्व परीक्षा २६ मे रोजी होणार आहे.  
   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

 

 

 
 
 
 

 

 

 
 

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of reference material for new syllabus of upsc
Show comments