घाऊक औषध विक्रेत्यांच्या ‘खरेदी बंद’चा परिणाम शहरात दिसू लागला असून अजून दोन ते आठ दिवसांत दुकानांमध्ये काही औषधांचा तुटवडा जाणवू लागणार असल्याचे मत किरकोळ विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. नियमित औषधे घ्यावे लागणारे रुग्ण तुटवडय़ाच्या भीतीने आतापासूनच दहा दिवसांच्या जागी महिनाभराची औषधे खरेदी करून ठेवत आहेत.
‘महिन्याच्या सुरुवातीला अतिरिक्त माल भरून ठेवला असल्याने कालपर्यंत तुटवडा निर्माण होईल असे वाटत नव्हते. मात्र आज २-३ ग्राहकांना औषधांच्या पुरवठय़ाअभावी परत पाठवावे लागले आहे. अजून २-३ दिवसांत दुकानात काही औषधांचा तुटवडा जाणवू लागेल,’ असे मत एका औषध विक्रेत्याने व्यक्त केले.
मोठय़ा किरकोळ विक्री दुकानांमध्ये तुटवडय़ाचा प्रश्न अद्याप नसून सहसा थेट उत्पादक कंपन्यांकडून माल खरेदी न करणाऱ्या लहान किरकोळ विक्रेत्यांकडे तुटवडा निर्माण झाल्याचे एका औषध विक्रेत्याने सांगितले. रक्तातील साखरेवरील औषधे, ‘क्रोसिन’च्या गोळ्या आणि ‘ओ.टी.सी.’ (ओव्हर द काउंटर) औषधे काही दुकानांत मिळत नसल्याचे या विक्रेत्याने सांगितले. ‘डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीतील औषध दुकानात उपलब्ध नसेल, तर औषध विक्रेते संबंधित डॉक्टरांना पर्यायी औषध देण्याबद्दल विचारणा करतात. दुकानांतील काही औषधे संपल्याच्या परिस्थितीत डॉक्टरही औषधांचा पर्याय स्वीकारण्यास तयार होत आहेत.  ग्राहकांची गैरसोय टाळण्यास पर्यायी औषधे उपयुक्त ठरत आहेत,’ असेही या विक्रेत्याने सांगितले.
काही किरकोळ दुकानांनी मात्र घाऊक विक्रेत्यांच्या खरेदी बंदची कुणकुण लागताच भरपूर माल भरून ठेवला आहे. हा ‘बफर स्टॉक’ अजून आठ दिवस पुरणार असल्याचे या औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
रुग्णालयातील व मोठे किरकोळ विक्रेते  
औषधांचा अतिरिक्त साठा करून विकणार
घाऊक औषध विक्रेत्यांच्या ‘खरेदी बंद’चा फटका सामान्य नागरिकांना बसू नये या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी रुग्णालयांतील औषध विक्रेते व मोठे किरकोळ विक्रेते यांची बैठक बोलवली होती. रुग्णालयांतील तसेच मोठय़ा किरकोळ विक्रेत्यांनी औषधांचा अतिरिक्त साठा खरेदी करून डॉक्टर व लहान किरकोळ दुकानांना औषध विक्री करावी, अशी पर्यायी व्यवस्था निर्माण केल्याचे औषध विभागाचे सह आयुक्त बा. रे. मासळ यांनी सांगितले. एफडीएने पुणे जिल्ह्य़ातील औषध विक्रीचा आढावा घेतला असून सध्या तरी औषधांचा तुटवडा आढळला नसल्याचे मासळ म्हणाले.