पिंपरी-चिंचवड शहरात भर दिवसा गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज (सोमवारी) दुपारी अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. सोन्या तापकीर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या तापकीर हा चिखली चौकात थांबला होता. तेव्हा, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी होऊन सोन्या तापकीरचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनोळखी हल्लेखोर पसार झाले आहेत. त्यांचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्या तापकीर याचे एका व्यक्तिशी वाद झाले होते अशी प्राथमिक माहिती पोलिसानी दिली आहे. १२ मे रोजी भर दिवसा किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे का? असे नागरिक विचारत आहेत.