आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क आकारल्याप्रकरणी लष्कर भागातील सेंट झेवियर्स प्राथमिक शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी असलेल्या पंचवीस टक्के राखीव जागांअंतर्गत विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला होता.
जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांनी केलेल्या चौकशीत या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १८५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आल्याचे उघड झाले आहे.
भुजबळ म्हणाले, ‘‘या शाळेकडे पंचवीस टक्के राखीव जागांसाठी एकूण १०१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यांपैकी ३० विद्यार्थ्यांची अंतिमत: राखीव जागांअंतर्गत निवड झाली. ३ एप्रिल रोजी यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळेचे १८,५०० रुपये शुल्क कॅथोलिक सीरियन बँकेत जमा केले. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारणे अपेक्षित नाही. शाळेला या विद्यार्थ्यांसाठीचे शुल्क शासनाकडून मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना शुल्क परत मिळेल, असे शाळेकडून सांगण्यात येत होते. या प्रकरणी शाळा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.’’
या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क होऊ शकला नाही.  
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Show cause notice to saint xaviers school
Show comments