लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : नागरिकांना भेटीसाठी राखीव ठेवलेल्या आठवड्यातील तीन दिवसांच्या वेळेत दोन अतिरिक्त आयुक्तांसह ३४ वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

महापालिकेत मागील तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. अनेक नागरिक कामासाठी महापालिकेत येतात. मात्र, अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी भेटीची वेळ देणे, नोंद वही ठेवणे, भेटीची वेळ दर्शविणारे फलक लावणे आदी सूचना दिल्या आहेत. विविध कामांसाठी महापालिकेत येणा-या नागरिकांना भेटण्यासाठीच्या अधिकाऱ्यांच्या वेळा आयुक्त सिंह यांनी निश्चित केल्या आहेत.

सर्व विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजासाठी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दुपारी तीन ते सायंकाळी सहा ही समान वेळ राखीव ठेवावी. या कालावधीत विभाग अंतर्गत बैठका, प्रकल्प भेटीचे आयोजन करू नये. भेटीचा कालावधी सूचना फलकांवर ठळकपणे प्रदर्शित करावा. प्रत्येक नागरिकांचे म्हणणे पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावे. त्यांना आवश्यक सहकार्य करावे. तक्रारींचे अधिक जलदगतीने निराकारण करावे. तक्रारींचे निराकारण झाले की नाही याची खात्री करावी. संबंधितांना त्याची माहिती द्यावी.

त्याचबरोबर कार्यालयीन वेळेनंतरच कार्यालय सोडण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नागरिकांसाठीच्या राखीव वेळेत ३४ अधिकारी कार्यालयात हजर नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाच्या पाहणीत समोर आले. दहा दिवसांचा अधिका-यांच्या उपस्थितीचा अहवाल तयार करून तो आयुक्तांकडे सादर केला आहे. यामध्ये ३४ अधिकारी एकपेक्षा अधिक वेळा गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

गैरहजर अधिकारी

पथकाने केलेल्या तपासणीत सर्वाधिक सहा दिवस लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहायक आयुक्त अमित पंडीत, महेश वाघमाेडे, मुकेश काेळप, बाबासाहेब गलबले प्रत्येकी चार वेळा गैरहजर आढळून आले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त तानाजी नरळे, उमेश ढाकणे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, उपायुक्त मनोज लोणकर, सचिन पवार, पंकज पाटील, अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, राजेश आगळे, प्रदीप ठेंगल, सहशहर अभियंता संजय खाबडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आयुक्त अविनाश शिंदे, शितल वाकडे, महेश काळे, अजिंक्य येळे, विजय थोरात, माणिक चव्हाण, सुचिता पानसरे, श्रीकांत कोळप, किशोर ननावरे, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांचा भेटण्याच्या वेळी उपस्थित न राहणा-यांमध्ये समावेश आहे.

नागरिकांना भेटण्याची अधिकाऱ्यांना वेळ निश्चित करून दिली आहे. तपासणी पथकाच्या पाहणीत नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध न राहणा-या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिली आहे. त्यानुसार विभाग नोटीस देण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Story img Loader