पुणे : जिवाची काहिली करणारा असह्य उकाडा, जनजीवन विस्कळीत करणाऱ्या उत्तरेकडील उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटातून दिलासा देणारा मोसमी पाऊस दोन दिवस अगोदरच गुरुवारी (३० मे) केरळसह दक्षिण तमिळनाडू आणि ईशान्य भारतात दाखल झाला आहे. केरळ आणि ईशान्येत आनंद सरींचा वर्षाव सुरू झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (३० मे) मोसमी पाऊस केरळ, ईशान्य भारतातील संपूर्ण नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि आसामच्या बहुतांश भागात दाखल झाला आहे. यासह लक्षद्वीप, दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण तमिळनाडूतही मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे.
मोसमी पाऊस सरासरी एक जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. पण, यंदा दोन दिवस अगोदरच तो केरळमध्ये दाखल झाला आहे. ईशान्य भारतात मोसमी पाऊस पाच जूनच्या सुमारास दाखल होतो. यंदा सात दिवस अगोदरच मोसमी पाऊस बहुतांश ईशान्य भारतात दाखल झाला आहे. ईशान्येसह दक्षिण भारतात पुढील चार दिवस दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – शहरबात : ‘ससून’चा धडा संपूर्ण राज्याला लागू
राजस्थान, दिल्लीसह उत्तर भारतात सुरू असलेल्या उष्णतेच्या झळाही शुक्रवारपासून (३१ मे) कमी होतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मोसमी पाऊस केरळमध्ये
दाखल झालेल्या तारखा
२०१३ – १ जून
२०१७ – ३० मे
२०१९ – ८ जून
२०२० – १ जून
२०२१ – ३ जून
२०२२ – २९ मे
२०२३ – ८ जून
२०२४ – ३० मे
राज्यात सहा जूनपर्यंत हजेरी शक्य
केरळमध्ये दोन दिवस अगोदरच दाखल झालेल्या मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. मोसमी पाऊस राज्यात पाच किंवा सहा जूनपर्यंत दाखल होईल. मोसमी पावसाच्या राज्यातील आगमनाला उशीर होणार नाही. हलक्या स्वरूपात का होईना पण, सहा जूनपासून मोसमी पाऊस तळकोकणात सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.
© The Indian Express (P) Ltd