कमांड हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी  मिळवून देण्याच्या आमिषाने दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दिगंबर उर्फ राहुल हिरामण मोहिते (वय २०, रा. कमांड हॉस्पीटल बंगला, सर्व्हट क्वार्टर, वानवडी), जुबेदा अजगर शेख (वय ३३, रा. कोंढवा बुद्रुक) आणि नंदा विष्णु शिंदे (वय ३३, रा. बालाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर राजू तांबोळी (रा. अहमदनगर) हा फरार आहे. याप्रकरणी वैशाली दीपक आंबेकर (वय ३०, रा. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू याची येथे वैशालीशी भेट झाली असता त्यांना कमांड हॉस्पीटल येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. ‘माझा भाऊ मिलिट्रीमध्ये नोकरीस असून एका मेजरच्या कार्यालयात नोकरी करतो,’ असे सांगून वैशाली यांना नर्स म्हणून नोकरी मिळवून देण्यासाठी वेळोवेळी दोन लाख रुपये घेतले. त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले. त्या हॉस्पीटलमध्ये गेल्या असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणाची सुरूवातीला लष्कराच्या गुप्तचर विभागाने चौकशी करून या तिघांचा शोध घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

Story img Loader