आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ आणली आहे. या योजनेत बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना शून्य अथवा अल्प व्याजदराने शैक्षणिक कर्ज दिले जाणार आहे.

या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केली. या योजनेनुसार बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींना त्यांच्या पदवीपर्यतच्या शिक्षणासाठी कर्ज दिले जाईल. यातील पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने, पाच ते १० लाखांपर्यंतचे दोन टक्के व्याजदराने आणि १० ते १५ लाखापर्यंतचे चार टक्के व्याजदराने दिले जाईल. या कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नसून, प्रक्रियाशुल्कही घेतले जाणार नाही. या योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी जामीनदाराचीही आवश्यकता असणार नाही.

हेही वाचा >>> वाहनचालकांकडून ‘चवलीपावली’ घेणारे दोन पोलीस हवालदार निलंबित; पैसे घेतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

या वेळी बँकेकडून सरकारला देय असलेला १० कोटी रुपये लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले. बँकेचे प्रव्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी आभार मानले, तर राज्य बँकेच्या उपसरव्यवस्थापिका डॉ. तेजल कोरडे यांनी सूत्रसंचालन केले.

गुणवान विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख पारितोषिकही दिले जाणार आहे. अंतिम परीक्षेत सरासरी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. याचवेळी अंतिम परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाखापर्यंतचे रोख पारितोषिक दिले जाईल.

Story img Loader