ऊन-पावसाचा खेळ अन् अधूनमधून बरसणाऱ्या हलक्या सरी.. हे श्रावण महिन्याचे वैशिष्टय़! पण त्याला या वेळचा श्रावण अगदीच अपवादच ठरला. सुरुवातीला पावसाची मोठी उघडीप आणि शेवटचे तीन दिवस वादळी पावसाने दिलेला मोठा तडाखा यामुळे हा श्रावणच सुरू आहे का, अशी शंका यावी अशी स्थिती निर्माण केली. विशेष म्हणजे, गेल्या शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत थोडाथोडका नव्हे, तर १२३ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
या वेळचा पावसाळा सर्वच दृष्टीने वेगळा ठरला आहे. पुण्यात मान्सूनचे वेळेवर आगमन होऊनही संततधार पाऊस सुरू व्हायला तब्बल सव्वा महिने उशीर झाला. त्यानंतर महिनाभर पावसाने चांगली हजेरी लावली आणि पाण्याची तूट भरून काढली. त्यानंतर मात्र पुन्हा उघडीप दिली. त्यामुळे गेले दोन आठवडे पावसाने विश्रांतीच घेतली होती. मात्र, गेल्या गुरुवारपासून वादळी पावसाने हजेरी लावणे सुरू केले. सकाळपासून दुपापर्यंत उकाडा, त्यानंतर दुपारच्या वेळी आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळी मोठय़ा पावसाला सुरुवात अशा पद्धतीचे गेले तीन-चार दिवसाचे वातावरण आहे. असे वातावरण सामान्यत: उन्हाळ्यात असतो जेव्हा वादळी पाऊस पडतो. त्याचाच अनुभव सध्या येत आहे. सोमवारी (२५ ऑगस्ट) श्रावण महिन्याची अखेर झाली. या महिन्याच्या शेवटच्या काळात अशाच पावसाने हजेरी लावली. शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवसांत पुण्यात अनुक्रमे ३३.५, २६.३ आणि ६३.३ मिलिमीटर असा एकूण १२३.१ मिलिमीटर इतका पाऊस पडला. हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्यामुळे तो सर्वच भागात इतक्या प्रमाणात पडला नाही. विशेष म्हणजे पुणे शहराच्या तुलनेत पुण्याला पाणी पुरविणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात कमी पाऊस पडला.
पाऊस दुपारनंतरचाच!
पुण्यात गेले तीन-चार दिवस पडलेल्या पावसाचे वैशिष्टय़ म्हणजे जास्तीत जास्त पाऊस सायंकाळनंतरच पडला. शुक्रवार ते रविवार या काळाच पुणे वेधशाळेत एकूण १२३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यापैकी ६.३ मिलिमीटर पाऊस हा सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान पडला. उरलेला पाऊस (११६.८ मिलिमीटर) सायंकाळी साडेपाचनंतर पडला.
आजही वादळी पावसाची शक्यता
पुण्यात वादळी पावसाचा जोर मंगळवारीसुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे. मंगळवारनंतर मात्र वादळी पावसाची स्थिती दूर होईल. त्यानंतर गणपतीच्या काळात संततधार पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा