लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागातील मंदिरातील दानपेटी उचकटून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीन दानपेटी फोडण्याचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्याने पंधरा दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याचे उघडकीस आले.
साहिल अशोक माने (वय १९, रा. इंदीरा गांधी वसाहत, औंध रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. नारायण पेठेतील प्रगतीशील मित्र मंडळ गणपती मंदीरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ११ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. दानपेटी फोडून पसार झालेले चोरटे चित्रीकरणात आढळून आले होते.
आणखी वाचा-मोठी बातमी ! पोर्श अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक
वाहन क्रमांकाच्या पाटीवरुन पोलिसांनी तपास सुरू केला. औंध परिसरात अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साहिल माने याच्या मदतीने फर्ग्युसन रस्त्यावरील संत तुकाराम पादुका मंदिर, शनिवार पेठ सार्वजनिक नवरात्रोत्सव ट्रस्ट, तसेच प्रगतीशील मंडळाच्या मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याचे उघड झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, दत्ता सोनवणे, निलेश साबळे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर, अण्णा माने, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, विठ्ठल साळुंके, रुक्साना नदाफ यांनी ही कारवाई केली.