पुणे : ‘आम्ही भारतीय आहोत. संविधानाने आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. तरीही आमचे हक्क मिळविण्यासाठी भांडावे लागते. आमच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वोच्च न्यायायलायात ११ वर्षांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही आम्हा तृतीयपंथीच्या लढ्याला न्याय मिळत नाही,’ अशी खंत तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि सखी चारचौघी या संस्थेच्या संचालक श्रीगौरी सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
हिंदू महिला सभेतर्फे आयोजित ‘एक टाळी आणि बरंच काही’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले, प्रसिद्ध लेखिका व ज्येष्ठ मुलाखतकार माधुरी ताम्हणे यांनी श्रीगौरी यांच्याशी संवाद साधला. पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्ये तृतीयपंथी म्हणून वावरताना, त्यांच्यासाठी काम करताना आलेले चांगले-वाईट अनुभव ते ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकलेले २५ लाख रुपये असा प्रवास श्रीगौरी यांनी कथन केला.
‘तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आम्हाला शाळेतील मुलांनाही शिकवण्याची संधी मिळायला हवी,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. मीना कुर्लेकर यांनी आभार मानले.