पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साधेपणाने होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना यंदा गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. गणेशोत्सवाच्या इतिहासामध्ये प्रथमच हा नवा पायंडा पाडला जाणार आहे. श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते तर अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते होणार आहे.
श्री गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल.
श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केसरीवाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते तर केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापनातुळशीबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. गणेशोत्सवाच्या १२८ वर्षांच्या इतिसाहात प्रथमच असे घडणार असून याद्वारे मंडळातील आपापसातील स्नेहभाव वृद्धिंगत होणार आहे, अशी माहिती श्री
कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी मंगळवारी दिली. गणेश मंडळांनी सत्यविनायक पूजा करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
राजाभाऊ टिकार, प्रवीण परदेशी, विवेक खटावकर, अनिल सकपाळ, महेश सूर्यवंशी, संजय मते, संजीव जावळे, सुनील रासने, नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी या वेळी उपस्थित होते.
गणरायापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. आता भाविकांनी गणरायापासून सुरक्षित अंतर ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन श्रीकांत शेटे यांनी केले. गणरायाच्या दर्शनासाठी उत्सव मंडपामध्ये न येता घरबसल्या गणरायाचे ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे शेटे यांनी सांगितले. मान्यवरांनाही दर्शनासाठी येऊ नका, असे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.