नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांचे आज नव्वदीत पदार्पण

कलाकारासाठी अभिनय हाच महत्त्वाचा असतो. मग, ते नाटक असो, चित्रपट की तमाशा हा माध्यमाचा भाग नंतर येतो. एकदाचा अभिनय माझ्या बोकांडी असा बसला की तो मला सोडेनाच. ‘तू माध्यम कोणतेही घे. पण, अभिनय सोडू नको’, हेच मला खुणावत राहिले. त्यामुळे कलाकारासाठी माध्यमापेक्षाही अभिनय करणे हेच महत्त्वाचे असते, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांनी मंगळवारी व्यक्त केली.

‘िपजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ अशा मराठी चित्रपटांसह ‘हिमालयाची सावली’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘नटसम्राट’, ‘मित्र’ अशा नाटकांतून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे डॉ. श्रीराम लागू बुधवारी (१६ नोव्हेंबर) नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. ‘नट हा फिलोसॉफर आणि अ‍ॅथलिट असलाच पाहिजे’, ही माझी भूमिका सार्वकालिक असल्याने सध्याच्या अभिनेत्यांनाही ते लागू पडते, असेही त्यांनी सांगितले.

मागे वळून पाहताना छान वाटतंय. अभिनयाच्या क्षेत्रात आल्याचा पश्चात्ताप झाला नाही. अर्थात मी काही फार मोठा पराक्रम केला किंवा मोठे माप माझ्या पदरात पडले असा माझा बिलकूल दावा नाही. मी अभिनेता म्हणजेच नट आहे. मी नाटककाराचे शब्द रसिकांपर्यंत पोहोचविणारा मजूर नव्हे, लमाण आहे. त्यामुळे कलाकार अतृप्त असतो असे जे म्हटले जाते ते मला लागू होत नाही, असे सांगून डॉ. लागू म्हणाले, नाटक हा प्रकारच असा आहे, की त्याने माझं नरडं पकडलं. एखादा कलाकार कलेशी किती प्रमाणात प्रामाणिक वा बेशिस्त आहे याचे मोजमाप करण्याची कोणतीही फूटपट्टी नाही. काही कमी प्रमाणात असतात. काही अति तर काही फाजील आत्मविश्वासाने पछाडलेले असतात.

नाटकात काम करण्याआधी मी चित्रपटवेडा होतो. या माध्यमाविषयी प्रेम अधिक असल्याने अधिकाधिक चित्रपट पाहायचो. काही अद्भुतरम्य म्हणजे ‘फँटास्टिक’ आहे याची जाणीव झाली. चित्रपट हे माध्यम लोकांना सोपे, जवळचे आणि चांगले वाटले, असे सांगून डॉ. लागू म्हणाले, नाटक करायचे तर ते आवडलेच पाहिजे असा मी अट्टहास कधी धरला नाही. नाटक करताना त्रास होत असेल, तर ते नाटक करूच नये. नट म्हणून व्यक्तिरेखा साकारणे एवढेच काम असते. मग त्या कलाकाराने भूमिकेत गुंतून राहायचेच नाही. त्यासाठी माणूस मनाने मोकळा असला पाहिजे. वेदनांनी व्यग्र असेल, तर मग त्याला नीट अभिनय करता येणार नाही. अभिनय या गोष्टीला प्राधान्य.

Story img Loader