इंदापूर: रयत शिक्षण संस्था संचलित इंदापूर येथील सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय सन १९७९/८० माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने रयत च्या माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जनरल सर्जन डॉ. श्रेणिक शहा व संस्थापक, बालरोग तज्ञ डॉ. लहू  कदम यांना कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी तत्कालीन गुरुजन कृष्णाजी बयाजी कर्णे व सौ. शकुंतला उत्तमराव गाडेकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श गुरुजन पुरस्कार देवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पुरस्कार वितरण डॉ. संदेश शहा, सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी बाळासाहेब सुर्वे, सेवानिवृत शिक्षिका सौ. सुरेखा यादव, जोहरा सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. इंदापूर आयएमए च्या नितू  मांडके सभागृहात तब्बल ४४ वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात हे पुरस्कार वितरण संपन्न झाले.

सूर्यकांत कडू यांची हनुमान उडी तसेच खंडेराव सोनवले याचा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झिरो ते हिरो ( विद्यार्थी ते कर निर्धारण व संकलक अधीक्षक, मुंबई महानगरपालिका असा  प्रवास ), सात विविध शस्त्रक्रिया होऊन मृत्यूच्या दारातून परत आलेले कृष्णाजी कर्णे सर, राजेंद्र कांबळे रुकडीकर, साक्षी रुकडीकर यांच्यासह सर्वांनी केलेले नृत्य, अभिमन्यू भोंग याची मिश्किली कार्यक्रमाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यावेळी प्रत्येक वर्षी २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त माजी विद्यार्थी स्नेहमेळावा घेण्याचा ठराव झाला.कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रेणिक शहा यांनी इंदापूर रयत शिक्षण संस्थेच्या पत्र्याच्या खोली ते भव्य इमारत प्रवासाची माहिती सर्वांना दिली. रयत च्या सर्व वर्गाच्या माजी सक्रिय विद्यार्थ्यांची शिखर संघटना करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन महत्प्रयासाने प्रथितयश बालरोगतज्ज्ञ होऊन भावी पीढीचे सुदृढ आरोग्यासाठी जीवन समर्पित करताना ज्या शाळेत जे अणवाणी पायाने रयत च्या पत्र्याच्या शाळेत आले. त्या डॉ.लहू कदम यांनी आपली आई कस्तुरबाईच्या नावाने संपूर्ण शाळेची इमारत ‘रयत’ संस्थेला   बांधून देऊन स्वतःही ‘गुरूकुल’   शाळा काढून इंदापूरच्या भूमीला दिलेल्या योगदानाबद्दल  इंदापूरचे छोटे ‘कर्मवीर अण्णा’ या शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी डॉ. कदम म्हणाले, श्रद्धेय कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार पुढे घेऊन आम्ही आयुष्यात यशस्वी झालो. त्यामुळे कर्मवीर आण्णांच्या नावाने दिलेल्या पुरस्कारामुळे जबाबदारीत वाढ झाली असून त्यांचे विचार संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. यावेळी श्री. कर्णे सर व सौ. गाडेकर मॅडम यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी साठी गाठली असल्याने सर्वांनी आरोग्य दिनचर्ये चे काटेकोर पालन करून कर्मवीर आण्णा यांच्या विचाराचा प्रसार करण्याचे आवाहन केले.

यावेळी बाळासाहेब सुर्वे, राहुल सवणे, जोहरा सय्यद, भारत शेलार, हसीना मुलाणी, अलका जामदार, सुधीर मखरे, प्रकाश सोनवणे, अरुणा गलांडे, जनार्दन क्षीरसागर, सादिक मोमीन यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत डॉ. संदेश शहा, लता जामदार, शालिनी जाधव उबाळे यांनी तर प्रास्ताविक प्रा. अंकुश सूर्यवंशी यांनी केले. खंडेराव सोनवले याने बहारदार सूत्र संचलन केले. आभार प्रदर्शन सुरेखा यादव शिरसट यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील घुमटकर, गणेश मेणसे यांनी प्रयत्न केले.