तुम्ही कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा हॉटेलमध्ये किंवा अगदी गाडीवर, टपरीवर वडापाव खायला गेलात आणि एकटे असाल तर काय ऑर्डर देता, एक वडा-पाव दे. दोघं-तिघं असतील तर सांगता दोन वडापाव दे, नाहीतर तीन वडापाव दे.. पण पुण्यात एक दुकान मात्र असं आहे की, तिथे वडापाव खायला गेल्यानंतर ‘दोन वडे, एक पाव’ अशीच ऑर्डर द्यावी लागते. एका पावाबरोबर दोन वडे ही या वडय़ाची मुख्य खासियत. सहकारनगरमध्ये शिंदे हायस्कूलजवळ असलेल्या ‘श्रीकृष्ण वडेवाले’ यांच्याकडे गेल्यानंतर इतर ठिकाणचं एक पाव आणि एक वडा असं गणित जमणार नाही. त्यामुळे इथे दोन वडे आणि एक पाव अशी ऑर्डर द्यावी लागते.

अर्थात, या वडय़ाची एवढीच खासियत नाही, तर त्याची इतरही अनेक चविष्ट वैशिष्टय़ आहेतच. कृष्णाजी बाबुराव भगत हे महापालिका शाळेतले एक शिक्षक. त्यांना कष्टाची आवडच होती. शिक्षकी पेशातून ते पुढे मुख्याध्यापकही झाले. तरी कष्टांना कधी मागे हटले नाहीत. ते सकाळी दुधाची रतिबं घालायचे. दुपारी शिक्षकाची नोकरी. संध्याकाळच्या वेळेत त्यांना स्वस्थ बसवेना  म्हणून त्यांनी ‘श्रीकृष्ण स्वीट्स’ हा व्यवसाय १९६८ मध्ये सहकारनगरमध्ये सुरू केला. मुळात विविध खाद्यपदार्थ; विशेषत: मिठाई तयार करण्यात भगत यांचा हातखंडा होता. संध्याकाळी सहा ते रात्री दहा असा व्यवसाय सुरू होता. त्यालाच भगत यांनी वडापावची जोड दिली. पुढे १९९७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हा वडापावचा व्यवसाय सुरू केला आणि या काळात धंद्यात त्यांचा चांगला जम बसला. पत्नी शशिकला याही शिक्षिका होत्या. त्यांचीही साथ या व्यवसायात मिळाली आणि ‘श्रीकृष्ण वडेवाले’ हा पाहता पाहता ब्रँड झाला.

वडापाव तर सगळेच विकतात. चौकाचौकातील हातगाडय़ांवर पाच रुपयांनाही वडापाव मिळतो. मग या वडापावला एवढं यश कसं काय मिळालं तर त्याच्या दोन वैशिष्टय़ांमुळे. पहिलं वैशिष्टय़ म्हणजे इथे मिळणारा आकाराने मोठा आणि लुसलुशीत, ताजा पाव. वडापावसाठी एवढय़ा मोठय़ा आकाराचा पाव कोठेही वापरला जात नाही. भगत यांनी जेव्हा वडापावची विक्री सुरू केली तेव्हाच त्यांनी आकारानं मोठा पाव खास ऑर्डर देऊन तयार करून घेतला होता आणि तसाच पाव आजही दिला जातो. यिस्ट आणि सोडा वापरून फुगवलेले पाव सगळीकडे मिळतात; पण ‘श्रीकृष्ण’मध्ये मिळणाऱ्या पावात त्याचा वापर नसतो. त्यामुळे हा एक पाव सहा रुपयांना विकला जातो आणि चविष्ट, थोडा तिखट असा वडा आठ रुपयांना मिळतो. दोन वडे आणि एक पाव अशी बावीस रुपयांची खरेदी प्रत्येक खवय्या इथे किमान करतोच. कारण एवढय़ा मोठय़ा पावाच्या आत दोन वडे ठेवावेच लागतात.

या वडय़ाचं वैशिष्टय़ म्हणजे त्यात कांदा, लसूण यांचा वापर केला जात नाही. त्या ऐवजी आलं, हिरवी मिरची, कोथिंबिर यांची पेस्ट करून मसाला तयार केला जातो आणि ही पेस्ट वडय़ाला चटकदार, चविष्ट बनवते. हे काम शशिकला भगत यांच्याकडे आहे. वडे तयार करण्यासाठी जो कच्चा माल वापरतो तो कितीही महाग असला तरी त्यात कधीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे ग्राहक टिकून आहेत, असा अनुभव सुयोग भगत सांगतात. कृष्णाजी भगत यांची सुयोग आणि संतोष ही पुढची पिढी आता हा व्यवसाय सांभाळत आहे. शिवाय व्यवसायाचा आणि पदार्थाचाही विस्तार दोघांनी केला आहे. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर गंगाधाम येथे आणि धनकवडी पोस्ट ऑफिसजवळ अशा ‘श्रीकृष्ण वडेवाले’ यांच्या दोन शाखा आहेत. वडय़ासाठी लागणारा सर्व कच्चा माल म्हणजे शेंगदाणा रिफाईंड तेल, इंदोर बटाटा, गावरान कोथिंबिर, टेलिफोन ही ब्रँडेड हरबरा डाळ याच वस्तू या वडय़ासाठी वापरल्या जातात. त्यामुळे या वडय़ाची चव इतकंच काय त्याचं रंग-रूप, आकार सारं कसं टिकून आहे. इथे कधीही गेलात तरी दोन वडे एक पाव ही ऑर्डर द्यायला विसरू नका.

कुठे आहे..

श्रीकृष्ण वडेवाले; सहकारनगरमध्ये. सारंग बस स्टॉपजवळ

Story img Loader