अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांनी शनिवारी मावळ लोकसभेचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी हजेरी लावल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या. लोकसभेचे वातावरण तापले असताना रविशंकर यांची ‘सदिच्छा’ भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
रविशंकर शनिवारी सकाळी पिंपळे गुरव येथे आले. ते तासभर जगताप यांच्या निवासस्थानी होते. या वेळी खासदार गजानन बाबर, उमेश चांदगुडे, जगताप परिवारासह रविशंकर यांचे अनुयायी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी रविशंकर यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. ही सदिच्छा भेट असल्याचे रविशंकर यांच्या अनुयायांकडून सांगण्यात आले.

Story img Loader