पुण्यात यंदा गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात रंगलेला वाद आज विसर्जनाच्या दिवशीही कायम असल्याचे दिसत आहे. मंडळाकडून गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या रथावर एक फलक लावण्यात आला आहे. या फलकावर भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांची छायाचित्र लावण्यात आली आहेत. मात्र, या छायाचित्रांच्या वरच्या बाजूला लिहण्यात आलेला मथळा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यानुसार भाऊसाहेब रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक तर लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रसारक म्हटले आहे. साहजिकच मिरवणूक रथावरील हा फलक पुण्यात आज चर्चेचा विषय ठरणार आहे.
Mumbai Live updates: गणेश गल्लीचा राजा मंडपातून मार्गस्थ; मिरवणूक सोहळ्याला सुरुवात
यंदा गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली होती. यंदा गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हावरून टिळकांचे चित्र काढून टाकण्यात आले होते.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असून पालिका आणि सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा दावा मंडळाकडून करण्यात आला होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यातील गणेशोत्सवाला १८८२ पासून सुरुवात केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजानिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. मात्र, आजवर झालेल्या उत्सवात त्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला जात नाही. सुरूवातीच्या काळात तीन गणपती बसवले जात होते. त्यानंतर मानाच्या गणपतीचा उत्सव साजरा केला गेला. याच्या सर्व नोंदी इतिहासात पाहायला मिळतात. मात्र, सरकारकडून खऱ्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पुढील काळात महापालिकेने याची दखल घ्यावी. तसेच त्यांच्या नावाने हा उत्सव साजरा केला पाहिजे. तसेच यंदाचे वर्ष हे गणेशोत्वाचे १२६ वे वर्ष असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत महापौर आणि राज्य सरकारकडे गतवर्षापासून पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असून याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाने दिला होता.