पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे जगभरात भाविक आहेत. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. थायलंडमधील फुकेत येथे आता हुबेहुब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर साकारण्यात आले आहे. फुकेतमधील मंदिरात विधीवत ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने हुबेहुब साकारलेल्या मूर्तींची बुधवारी लाल महाल ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात झालेल्या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण राजूशेठ सांकला, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मूर्तीचे विधिवत पूजन करण्यासाठी फुकेत ९ रियल इस्टेट कंपनी लिमिटेडच्या अध्यक्ष, उद्योजिका पापा सॉन मिपा आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. उद्योजिका पापा सॉन मिपा यांनी स्वखर्चातून फुकेतमध्ये मंदिर साकारले आहे. त्यासाठी ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी चेतन लोढा यांनी समन्वय साधून विशेष सहकार्य केले.
हे ही वाचा… पुणे : लूटमार करणाऱ्या चोरट्याकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त, विश्रामबाग पोलिसांकडून चोरट्याला अटक
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने आम्हाला उर्जा मिळते. फुकेतमध्ये मंदिर उभारणे हे अशक्यप्राय वाटत होते. मात्र, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. थायलंडच्या पंतप्रधानांनी फुकेतमध्ये बांधण्यात आलेल्या मंदिराची पाहणी केली, असे पापा सॉन मिपा यांनी नमूद केले.
थायलंडमध्ये ५० फूट उंच मंदिर साकारण्यात आले आहे. हे गणपती मंदिर ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ या नावाने रवाई बीच फुकेतमध्ये साकारण्यात येणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन आता थायलंडसह परिसरातील भाविकांना घेता येईल. दगडूशेठ गणपतीच्या मुख्य मूर्ती सोबत पंचधातूची छोटी मूर्ती, त्याचबरोबर सिद्धी माता, बुद्धी माता, श्री लक्ष, श्री लाभ या मूर्तींची देखील तेथील मंदिरात कायमस्वरूपी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील मंदिरात जसे शंकराचे मंदिर आहे तसेच फुकेत येथील मंदिरात देखील असणार आहे. दगडूशेठ गणपती मंदिरातील मूर्तीप्रमाणे हुबेहूब मूर्ती पुण्यात साकारण्यात आली. मूर्ती साकारण्यासाठी एक वर्ष २० दिवस कालावधी लागला आहे. थायलंडमधून अनेक भाविक पुण्यात येतात. आता भाविकांना तेथे दर्शन घेता येणार आहे. थायलंडमधील मंदिरासाठी नऊ कोटी रुपये खर्च आतापर्यंत झाला आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले.
हे ही वाचा… आळंदी रस्त्यावरील कळस गावात दोन गटात हाणामारी
दीड वर्षात मंदिराचे काम पूर्ण
थायलंडमधीलमंदिराचे भूमीपूजन जुलै २०२३ रोजी करण्यात आले. दीड वर्षातमंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यांनी तेथील मूर्तीमध्ये सुद्धा गणेश यंत्र विधीवत पूजन करून बसवले आहे. फुकेतमध्ये प्राणप्रतिष्ठाना करून लवकरच मंदिर थायलंडमधील भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ‘श्रीं’च्या मूतीसाठी दागिने देखील करण्यात आले आहेत.