Shrimant Dagdusheth Halwai Ganpati: मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल ५२१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यांमध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला.
हेही वाचा : Sanjay Raut: १७ तारखेला शिवतीर्थावर सांगता सभा होणार – खासदार संजय राऊत
यावेळी सुनील रासने म्हणाले की, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.