माझे सत्य हे अध्यक्षपदापेक्षा मोठे असून त्याच्याशी कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या एकेरी उल्लेखाबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मंगळवारी दुपारी पत्रकारांशी बोलणाऱ्या नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संमेलन तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना अवघ्या तीन तासांत भूमिका बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करताना खेडूत असल्याने माझ्याकडून त्यांचा एकेरी उल्लेख झाला असून ते शब्द मी मागे घेत आहे. त्याबद्दल मी अस्वस्थ, दु:खी आणि दिलगीर आहे, अशा शब्दांत साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांची दिलगिरी व्यक्त केली आहे. या संदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवून ‘मन की बात’ सांगितली असल्याचे सबनीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. या पत्रावर ५ जानेवारी असा दिनांक असून त्याची माहिती मात्र त्यांनी आज इतक्या उशीराने जाहीर केली.
पिंपरी येथील कार्यक्रमात बोलताना सबनीस यांनी नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. या विषयावरून राज्यामध्ये वादंग निर्माण झाला होता. जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत सबनीस यांना संमेलनाच्या व्यासपीठावर पाऊल ठेवू दिले जाणार नाही, अशी भूमिका घेत खासदार अमर साबळे यांनी आंदोलन केले. त्या पाश्र्वभूमीवर संमेलनाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना सबनीस यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदीमध्ये लिहिलेले पत्र वाचून दाखविले. माझ्या मनामध्ये कुणाविषयीही किल्मिष नाही, असे सांगत सबनीस यांनी या वादावर पडदा पाडण्याची विनंती केली. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ अशी भावना व्यक्त करताना मराठी साहित्य आणि संस्कृतीचे संचित असलेले संमेलन सर्वाच्या सहभागातून यशस्वी करूयात, असे आवाहन केले. माजी आमदार उल्हास पवार या वेळी उपस्थित होते.
‘पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख ग्रामीण भागातील खेडूत असल्याने झाला. त्याविषयी महाराष्ट्रात काहींनी गैरसमज करून हंगामा केला. मला गोळ्या घालण्याची धमकी देण्यापर्यंत काहींची मजल गेली. या प्रकाराबद्दल मी अस्वस्थ, दु:खी आणि दिलगीर आहे.’, असे या पत्रात म्हटले आहे. पत्रकार परिषदेत आपण कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माझी भूमिका संवादाची आहे. कुठल्याही कारणाने हा संवाद तुटू नये या भावनेतून मी एकेरी उल्लेखाचे शब्द बाजूला काढून फेकून दिले आहे. माझ्या अनेक मित्रांनी हे एकेरी शब्द योग्य वाटत नाहीत याची जाणीव करून दिली. माझ्याही मनाला ते पटल्यामुळे मी हे शब्द मागे घेत आहे. ज्यांची मने दुखावली असतील त्यांची आणि मोदीसाहेबांची दिलगिरी व्यक्त करतो. मराठी संस्कृतीच्या कैवारी लोकांना शंका-कुशंका राहू नयेत. समजदार, सुज्ञ आणि पुण्यशील नागरिकांनी संमेलनाला उपस्थित राहावे. या भूमिकेचे स्वागत करून सर्वानी संमेलनात सहभागी व्हावे, अशी माझी आग्रहपूर्वक विनंती आहे.
—
दुपारी पत्रकारांशी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी ‘त्या एकेरी उल्लेखासाठी लोकशाही आणि घटना पणाला लावणार का? मी एकटा पडलो असलो, तरीही माझे सत्य मात्र एकटे नाही. मी मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे.’ असे सांगितले. ते असेही म्हणाले, ‘मराठी संस्कृतीला गाढवावर बसवता का? मोदी यांचा गौरव केला, म्हणून माफी मागायची का? मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. आपले खरेच काही चुकलेले नाही, अशी ग्वाही मला आतला आवाज देत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा