पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे जानेवारीमध्ये हे संमेलन होणार आहे.
डॉ. श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक ४८५ मते मिळाली. ज्येष्ठ कवी प्रा. विठ्ठल वाघ हे ३७३ मतदारांचे पाठबळ मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले. लेखक-प्रकाशक अरुण जाखडे यांना २३०, लेखक शरणकुमार िलबाळे यांना २५ तर, श्रीनिवास वारुंजीकर यांना केवळ दोन मते मिळाली. श्रीपाल सबनीस हे ११२ मतांच्या अधिक्याने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी शुक्रवारी जाहीर केले. या निवडणुकीमध्ये १ हजार ३३ मतपत्रिका साहित्य महामंडळाकडे परत आल्या होत्या. त्यापैकी २० मतपत्रिका अवैध ठरल्या. विजयी उमेदवारासाठी ५०७ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता. मात्र, पहिल्या फेरीमध्ये कोणत्याच उमेदवाराला हा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे निकाल चौथ्या फेरीपर्यंत गेला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी सबनीस यांचे अभिनंदन केले. पिंपरी-चिंचवड साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून सबनीस यांचे स्वागत केले. सबनीस यांच्या पत्नी ललिता सबनीस या वेळी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा रविवारी (८ नोव्हेंबर) परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. परिषदेच्या सभागृहामध्ये सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे प्रकाश पायगुडे यांनी सांगितले.
पुरस्कार परत करण्यापूर्वी सरकारशी संवाद साधावा –  श्रीपाल सबनीस  
देशामध्ये असहिष्णू परिस्थिती केवळ आजच आहे असे नाही. यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांतून देश ढवळून निघाला होता. असहिष्णू वातावरण असल्याच्या निषेधार्थ पुरस्कार परत करण्याच्या साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मी समर्थन करतो. पण, पुरस्कार परत करून निषेध करण्यापूर्वी साहित्यिकांनी सरकारशी संवाद साधायला पाहिजे, अशी भूमिका नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडली. सरकार आणि साहित्यिकांमध्ये संवादाचा पूल सांधला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सबनीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. असहिष्णू वातावरण, डॉ. दाभोलकर, पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध म्हणून पुरस्कार परत करणे हा एकमेव मार्ग नाही. साहित्यिकांनी आपले म्हणणे लेखनातून मांडले पाहिजे. साहित्यिकांच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी आदराची भावना आहे. मात्र, निषेध म्हणून पुरस्कार परत करण्याआधी सरकारशी संवाद साधला पाहिजे. सरकारनेही एक पाऊल पुढे टाकून साहित्यिकांशी संवाद साधावा. मात्र, हा संवादाचाच अभाव आहे. संघर्षांचे मोल मी जाणतो. पण, संघर्षांपेक्षाही संवादाला प्राधान्य देत महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा जोडण्यावर आपला भर राहील.
नूतन अध्यक्षांचा परिचय
हैदराबाद मुक्ती संग्रामाची क्रांतिभूमी असलेल्या हाडोळी (ता. निलंगा, जि. लातूर) हे श्रीपाल सबनीस यांचे जन्मगाव, रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे क्रांतिकारी मोहनराव सबनीस-पाटील हे त्यांचे वडील. एम.ए. आणि पीएच.डी. संपादन केलेल्या श्रीपाल सबनीस यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि कलाविद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून अध्यापन कार्य केले. प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले.
लेखनसंपदा : ज्ञानेश्वर ते आंबेडकर, सेक्युलर वाङ्मयीन अनुबंध, ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र, भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद, संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका, सेक्युलॅरिझम : प्रबोधनाचा मानदंड, परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा, साने गुरुजी विचार समीक्षा, ब्राह्मणी सत्यशोधक, उगवतीचा क्रांतिसूर्य, भारतरत्न आणि बहिष्कृत भारत, संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित, नारायण सुव्र्याच्या कवितेतील इहवादी समीक्षा, संत साहित्यातील सेक्युलॅरिझम, समतोल समीक्षा, आदिवासी-मुस्लीम-ख्रिश्चन साहित्य मीमांसा, तौलनिक साहित्य आणि भाषांतर मीमांसा, विद्रोही अनुबंध, कलासंचित, बृहन्महाराष्ट्राचे वाङ्मयीन संचित, नामदेवांचे संतत्व आणि कवित्व.
ललित लेखन : मुक्तक, उपेक्षितांची पहाट, जीव रंगला रंगला.
संपादित ग्रंथ : फ. म. शहाजिंदे यांची निवडक कविता, संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख, महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान, प्रबोधानपर्व (प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ)
नाटक : शुक्राची चांदणी, मुंबईला घेऊन चला
एकांकिका : सत्यकथा ८२, क्रांती, कॉलेज कॉर्नर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा