श्रीराम ओक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हसण्यासाठी जन्म आपुला असं नेहमी म्हटलं जातं. मात्र, ताणतणाव आणि धकाधकीच्या आयुष्यात आपण हसणंच विसरून गेलो आहोत. खरंतर दैनंदिन जीवनात घडणारे छोटे-मोठे विनोद नकळत हास्य फुलवतात आणि या हास्यावर काही तास, दिवस अगदी सहजपणे आनंदात जाऊ शकतात. आपण सहजच पाहिलेला, ऐकलेला, अनुभवलेला विनोदी किस्साही आपल्याला ऊर्जा देतो. हे हरवलेलं हास्य पुन्हा आपल्या चेहऱ्यावर उमटण्यासाठी, विनोदाला हक्काचं व्यासपीठ मिळण्यासाठी बारा वर्षांपूर्वी हेमंत नगरकर आणि मनोहर कोलते यांनी सुरू केलेल्या  ‘विनोदोत्तम करंडक’ या विनोदी एकांकिका स्पर्धेने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. पंधरा एकांकिकांपासून सुरू झालेला या स्पर्धेचा प्रवास आता पंचवीस एकांकिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

विनोदी एकांकिकांना वाहिलेली ही राज्यातील एकमेव स्पर्धा आहे. तसेच स्पर्धेत नैतिकतेच्या आणि निखळतेच्या सीमारेषा ओलांडणारी एकांकिका असू नये ही अपेक्षा आहे. विनोदाच्या बुरख्याआडून मार्मिक टिप्पणी करत, न बोचकारता सादरीकरणाची अपेक्षा पूर्ण करावी लागते. प्रेक्षकांना मनमुराद हसवण्याचे आव्हान स्वीकारून यंदा दहा संघांनी नवं लेखन असलेल्या एकांकिका सादर केल्या. एकांकिकेत लेखनाइतकेच अभिनय, रंगमंचीय अवकाशाचे भान, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या सर्व माध्यमांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक असते. बाष्कळ विनोदांचा भडिमार टाळून विनोदातील बीभत्सतेला दूर सारत, विनोदाच्या सर्व अंगाचा प्रभावी वापर करीत, विनोदाची पातळी न घसरण्याचे भान ठेवून सर्वच संघांना तारेवरची कसरत करावी लागली. केवळ पाठांतर केलेल्या, बालीशपणा असणाऱ्या, कलाकारांमध्ये विसंवादी सूर लागलेल्या, विकृतपणा असलेल्या, विक्षिप्त हालचालींवर भर असणाऱ्या, रंगमंचावर अशोभनीय हालचाली करणाऱ्या आणि विशेष परिणामकारक न ठरलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिळू शकली नाहीत.

विनोदाची म्हणून स्वत:ची अशी जातकुळी असते. त्या जातकुळीची निवड केल्यानंतर त्या विनोदाला बरोबर वागवत केला गेलेला प्रवासच प्रेक्षकांना खळखळून हसवू शकतो. विषयाची सुयोग्य निवड करण्यापासून रंगमंचीय आविष्कारासाठी सर्वच तंत्राचा अभ्यासपूर्ण वापर स्पर्धेमध्ये यशस्वी ठरू शकतो, हेच या स्पर्धेच्या विजेत्या एकांकिका पाहताना सहजच लक्षात येते. विनोदातील नावीन्य, अभिनयातील सहजता, संगीत आणि नेपथ्याचा उत्तम आविष्कार यांचा अनोखा मेळ असलेल्या यंदाच्या विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ‘व्हॉईट कॉमेडी’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘बँड बाजा हळद’ एकांकिकेने द्वितीय क्रमांक, व्हीआयआयटीच्या ‘भगदाड’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पिंपरी-चिंचवडच्या ऱ्हस्व दीर्घ संघ, पाटे नाटक कंपनी आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालय यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. अथर्व शाळीग्राम, शर्वरी लहाडे यांनी उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक, निरंजन लांगे, पुष्कर शिंदे यांना द्वितीय आणि तन्मय जठ्ठा, सागर खंडारे यांना तृतीय पारितोषिक मिळाले. आय. एन. के. ज्युनियरने लक्षवेधी संघ, आरंभ ग्रुपने शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक मिळवले.

उत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी तसेच उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट वेशभूषेसाठीही ‘व्हाईट कॉमेडी’ ची निवड झाली. सूरज गडगिळे, वैभव रंधवे हे अनुक्रमे प्रकाश योजना आणि नेपथ्यासाठी पात्र ठरले. उत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक  ‘व्हाईट कॉमेडी’ आणि ‘भारत बंद’ यांना विभागून देण्यात आले. अथर्व शाळीग्राम, शर्वरी लहाडे यांनी ‘व्हाईट कॉमेडी’साठीचे, तर पाटे नाटक कंपनीच्या स्वप्नील जोशी यांनी ‘भारत बंद’ साठीचे पारितोषिक पटकावले.

अभिनयातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकांसाठी पुरुषांमध्ये ‘व्हाईट कॉमेडी’ साठी व्यंकटेश सुंभे याने प्रथम क्रमांक, तर व्हीआयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तन्मय जठ्ठा याने ‘भगदाड’ एकांकिकेसाठी द्वितीय क्रमांक मिळवला. स्त्रियांच्या गटात ‘व्हाईट कॉमेडी’ साठी शर्वरी लहाडेला प्रथम क्रमांक आणि ‘भगदाड’साठी साक्षी दिघेला द्वितीय क्रमांक मिळवला. चैतन्य शेंबेकर, गणेश चौधरी, आशिष आढारी, ईश्वर अधंरे, सीमा निकम, नम्रता मोरे, तन्ही रोहमरे, श्रेया वाशीकर, ऐश्वर्या तुपे यांना अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आले.

गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘ऑन टाईम यजमान पसार’  या एकांकिकेच्या अनुष्का जोशी, कार्तिक भालेराव, सुजय शर्मा यांनी उत्कृष्ट पाश्र्वसंगीताचे पारितोषिक पटकावले.

तर फग्र्युसन महाविद्यालयाच्या ‘तीन पत्ते’ने उत्कृष्ट टीझर , इंदिरा कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅन्ड कॉमर्स ‘साईन आऊट’ने उत्कृष्ट पोस्टर पारितोषिक मिळवले. अभिनेता यतीन माझिरे, ध्वनी-प्रकाश योजना सांभाळणाऱ्या सुधीर फडतरे यांना विनोदवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. विनोद बिचारा आणि केविलवाणा होणार नाही याची दखल घेत असताना संहितेची चाचपणी करण्यात यावी, अशी अपेक्षा तीनही परीक्षकांच्या वतीने देवदत्त पाठक यांनी व्यक्त केली.

shriram.oak@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shriram oak article on comedy monologue
Show comments