लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर पडले आहेत. मागील वर्षभर तेजीत असलेले खासदार श्रीरंग बारणे, भाजप आमदार महेश लांडगे यांच्या गोटात अस्वस्थता दिसते. कायमच राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत: पवारांविरोधात आरोप करत जनतेतून निवडून येणाऱ्या बारणे, लांडगे यांची राजकीय कोंडी झाली असून, त्यांना पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांचे १५ वर्षे एकहाती वर्चस्व होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पवार यांनी राजकारणात संधी दिली. सन २०१४ मध्ये राजकीय वातावरण बदलताच जगताप भाजपवासी झाले होते. लांडगे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊनही त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जगताप, लांडगे यांनी अजित पवार यांना आव्हान देत पालिकेतून सत्ता खेचून आणली.
लांडगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनले. लांडगे यांची अजित पवारांच्या विरोधातील धार तीव्र होती. मागील वर्षभर लांडगे हे तेजीत होते. पालिकेतील प्रत्येक कामासाठी त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे तर पहिल्यापासून अजित पवार यांच्यासोबत राजकीय वैमनस्य आहे. बारणे यांनी वेळोवेळी राष्ट्रवादीविरोधात बिगुल छेडले. परिणामी, ते दोन वेळा खासदार झाले. सन २०१९ च्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव केला. शिंदे यांच्या राजवटीत खासदार बारणे ऐन भरात होते. काही दिवसांपूर्वी मावळचा पुढचा उमेदवार मीच असेही त्यांनी जाहीर केले होते. आता बदलत्या राजकीय घडामोडींमुळे त्यांची कोंडी झाली असून, घुसमट वाढणार आहे.
दरम्यान, अजित पवार सोबत आल्याने महायुतीची ताकत वाढली. त्यांच्यासोबत काम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचा दावा दोघेही करत असले, तरी त्यांच्यातील अस्वस्थता लपून राहिलेली नाही.