शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी श्रीरंग बारणे यांना प्रत्युत्तर दिल आहे. श्रीरंग बारणे यांनी काळजी करू नये, देवेंद्र फडणवीस हे सक्षमपणे गृहमंत्रिपद सांभाळत आहेत, असं म्हणत त्यांना खोचक टोला लगावला आहे. अमित गोरखे हे प्रसारमाध्यमांशी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिकांना दाद देत नसल्याचा आरोप करत थेट पोलीस आयुक्तांना पत्र दिलं होतं. पोलीस सर्वसामान्यांच्या तक्रारी घेत नाहीत असा आरोप त्यांनी केला. अप्रत्यक्षपणे श्रीरंग बारणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर आरोप केल्याने भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – पिंपरी : ‘बीआरटी’त घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई; ‘इतक्या’ कोटींचा दंड केला वसूल

श्रीरंग बारणे हे आमच्याच महायुतीत आहेत. आमच्यासोबत ते काम करत आहेत. मी त्यांच्याशी याबाबत बोलणार आहे. त्यांना कुठे आणि कसली अडचण आहे. हे जाणून घेणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रिपद सांभाळण्यास सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असे काही घडेल असे मला वाटत नाही. त्यामुळं श्रीरंग बारणे यांनी काळजी करू नये, असं गोरखे यांनी आवाहन करत खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा – पाचवी, आठवीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शुल्काचे काय? ना-नापास धोरणबदलानंतर उपस्थित प्रश्न अनुत्तरित

श्रीरंग बारणेंच्या आरोपांमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, एका प्रकरणात खासदार श्रीरंग बारणे यांचं म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतलं नव्हतं. याच प्रकरणात बारणेंचा अहंकार दुखावल्याने पोलिसांवर गंभीर आरोप केल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. नेमकं ते प्रकरण कुठं आहे. याविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrirang barne letter pimpri chinchwad police bjp amit gorkhe statement kjp 91 ssb