पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार खर्चात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे आघाडीवर आहेत. त्यांनी सर्वाधिक ५९ लाख १६६ रुपयांचा खर्च केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी ५७ लाख १२ हजार ५४२ रुपये खर्च करून प्रचार केला. दोघांच्याही प्रचार खर्चात तफावत असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस बजाविण्यात आली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात आली. पहिली तपासणी ३ मे, दुसरी ७ मे आणि तिसरी तपासणी ११ मे रोजी करण्यात आली. यापैकी पहिल्या तपासणीत बारणे आणि वाघेरे यांच्या प्रचार खर्चात तफावत आढळली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस बजावली होती. या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तफावतीचा खर्च अमान्य केला आहे. शेवटच्या खर्च तपासणीत देखील या दोघांच्या निवडणूक प्रतिनिधींनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाच्या शॅडो रजिस्टरमधील खर्चात तफावत आली आहे. बारणे यांनी ४३ लाख ८१ हजार १६६ रुपयांचा खर्च दाखविला. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ५९ लाख १६६ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे. बारणे यांच्या हिशेबात १५ लाख १९ हजार रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा – भोरमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांवर गोळीबार
वाघेरे यांनी ४९ लाख ८१ हजार ६९० रुपयांचा खर्च दाखविला. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ५७ लाख १२ हजार ५४२ रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. वाघेरे यांच्या हिशेबात ७ लाख ३० हजार ८५२ रुपयांची तफावत आढळली आहे. खर्चातील तफावतीबाबत बारणे आणि वाघेरे यांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर खुलासा करावा लागणार आहे. खुलासा न केल्यास हा खर्च मान्य असल्याचे समजून संबंधित उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे.
हेही वाचा – उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र, जागतिक हवामान संघटनेचा अहवाल काय सांगतो?
तीन अपक्ष उमेदवारांनाही नोटिसा
अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव, यशवंत पवार आणि संतोष उबाळे या तीन उमेदवारांनी दैनंदिन खर्चाची माहिती तपासणीसाठी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे त्यांनाही नोटीस देण्यात आली आहे.