पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या वतीने आयोजित ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवां’तर्गत (पिफ) ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना यंदाचा ‘पिफ डिस्टिंग्वीश ॲवाॅर्ड’ तर, प्रसिद्ध पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांना एस. डी. बर्मन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

जन्मशताब्दीनिमित्त ‘शो मॅन : राज कपूर’ ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे १३ फे्ब्रुवारी रोजी रोजी सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांना अभिवादन करण्याच्या उद्देशातून तालवाद्य वादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या कलाविष्काराने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल. मागार्रिटा विकारिओ दिग्दर्शित इटली आणि स्वित्झर्लंड या देशाची निर्मिती असलेला ‘ग्लोरिया’ हा महोत्सवाच्या उद्घाटनाचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ होणार असून स्पेनची निर्मिती असलेल्या पेड्रो अल्मोडोव्हॅर दिग्दर्शित ‘द रुम नेक्स्ट डोअर’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डाॅ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी दिली. चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आणि अभिजित रणदिवे या वेळी उपस्थित होते.

महोत्सवातील चित्रपटांचे परीक्षण मार्को बेकिस (चिली-इटालियन दिग्दर्शक- पटकथा लेखक), मार्गारिवा शिल (पोर्तुगीज चित्रपट  दिग्दर्शक, पेट्री कोटविचा-फिनिश (दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), तामिन्हे मिलानी (इराणी दिग्दर्शक), जॉर्जे स्टिचकोविच (सर्बिया, छायालेखक) , सुदथ महादिवुलवेवा (श्रीलंकन दिग्दर्शक), अर्चना (दक्षिण भारतीय अभिनेत्री) आणि अनिरुद्ध रॉय चौधरी (भारतीय दिग्दर्शक) हे करणार आहेत.  

महोत्सवातील महत्त्वाचे कार्यक्रम

-चित्रनगरीच्या स्वाती म्हसे पाटील (१४ फेब्रुवारी)

– माहितीपट दिग्दर्शकांशी चर्चा सहभाग – उमेश कुलकर्णी, अनुपमा श्रीनिवासन, सर्वनिक कौर, कुलदीप बर्वे (१५ फेब्रुवारी)

– बोमन इराणी यांचे विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान (१६ फेब्रुवारी)

– तपन सिन्हा जन्मशताब्दीनिमित्त ‘सिनेमा अँड सोल’, सहभाग – स्वपन मलिक, गौतम घोष (१७ फेब्रुवारी),

– कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून चित्रपटाच्या आशयाची निर्मिती या विषयावर पॅको टोरेस यांचे व्याख्यान (१८ फेब्रुवारी)

– ‘मराठी चित्रपटातील आव्हाने : निर्मिती ते प्रेक्षक’ या विषयावर चर्चासत्र, सहभाग – परेश मोकाशी, आदित्य सोरपोतदार, आदिनाथ कोठारे, सुनील फडतरे (१९ फेब्रुवारी)

Story img Loader