जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधाची परिणती डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये झाली, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी गुरुवारी व्यक्त केले. माणसाने विवेकी आणि बुद्धिप्रामाण्यवादी व्हावे हेच या कायद्याचे प्रयोजन असून या विषयीचे प्रबोधन करावे, असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ‘जादूटोणाविरोधी कायदा : समज आणि गैरसमज’ या विषयावर बोलताना श्याम मानव यांनी या कायद्याचे विविध पैलू उलगडले. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, महापौर चंचला कोद्रे आणि न्या. बी. जी. कोळसे पाटील या प्रसंगी व्यासपीठावर होते.
श्याम मानव म्हणाले, या कायद्याविषयी गैरसमजाचे वातावरण निर्माण केले गेले. अंतर्गत विरोध आणि त्याचा परिणाम मतांवर होईल या भीतीमुळे सरकार कायदा करण्यास धजावत नव्हते. दाभोलकरांच्या बलिदानामुळे हा कायदा झाला ही वस्तुस्थिती आहे. अनेक बाबा-मांत्रिकांचे धंदे या कायद्यामुळे बंद होणार आहेत. त्यांच्या विरोधाची परिणती दाभोलकरांच्या हत्येमध्ये झाली. या कायद्यानुसार तक्रार दाखल झाल्यास खटला न्यायालयात न्यावा लागेल. त्याचप्रमाणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. कायद्याचा कमीत कमी गैरपावर व्हावा याची दक्षता कायद्यामध्येच घेतली आहे. दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
दाभोलकर यांच्यामुळेच हा कायदा झाला. मात्र, दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत. दुष्ट प्रवृत्तींनी त्यांची हत्या केली असली, तरी त्यांचे विचार तेजस्वीपणे समोर येतील. त्यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधारही लवकर सापडतील, अशी आशा व्यक्त करून शिवाजीराव मोघे म्हणाले, त्यांच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी वटहुकमाद्वारे हा कायदा झाला. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल. रोजगार हमी योजनेप्रमाणेच हा कायदा देशाला मान्य करावा लागेल.
मूठभरांची दुकाने बंद करण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून जाण्याच्या उद्देशातून हा कायदा केला असल्याचे बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले. प्रवीण गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधाची परिणती दाभोलकरांच्या हत्येमध्ये – श्याम मानव
या कायद्याविषयी गैरसमजाचे वातावरण निर्माण केले गेले. अंतर्गत विरोध आणि त्याचा परिणाम मतांवर होईल या भीतीमुळे सरकार कायदा करण्यास धजावत नव्हते - श्याम मानव
आणखी वाचा
First published on: 27-09-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shyam manav speech on black magic and law