पुणे : वाहन उद्योगातील नवतंत्रज्ञान उलगडून दाखविणाऱ्या १८ व्या सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी अर्थात सिॲट २०२४ चे आयोजन २३ ते २५ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) ही द्विवार्षिक परिषद आयोजित केली आहे. ही परिषद मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्सिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटर (पीआयईसीसी) येथे होईल.
हेही वाचा >>> हवाई प्रवास बेभरवशाचा! जाणून घ्या पुणे विमानतळावरून कोणती अन् किती विमाने रद्द…
एआरएआयचे संचालक आणि सिॲट २०२४ चे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व सिॲटचे निमंत्रक विक्रम शिंदे, एआरएआयचे उपसंचालक व सिॲट एक्स्पोचे समन्वयक विजय पंखावाला, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे व आनंद देशपांडे, डॉ. सुकृत ठिपसे आदी उपस्थित होते.
सिॲट २०२४ चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रगतीशील गतिशीलतेच्या दिशेने परिवर्तन ही परिषदेची यावर्षीची संकल्पना आहे. यासोबतच अत्याधुनिक एनव्हीएच विकास केंद्र, ॲक्सिलरेटेड स्लेड लॅब, फोटोमेट्री प्रयोगशाळा, मोबिलिटी रिसर्च सेंटर (एमआरसी), टाकवे येथे उभारण्यात येत असलेली एडीएएस प्रणाली, सिलिंडर चाचणी आणि हाय एनर्जी इंम्पॅक्ट टेस्टिंग सुविधा यासारख्या नवीन सुविधांचे उद्घाटनही यावेळी होईल, असे डॉ. मथाई यांनी सांगितले.
दीड हजारहून अधिक तंत्रज्ञांचा सहभाग
सिॲट २०२४ मध्ये होणाऱ्या परिसंवादांत दीड हजारहून अधिक वाहनउद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञ सहभागी होतील. नऊ देशांतील तांत्रिक तज्ज्ञ हे ४८ तांत्रिक सत्रांमध्ये त्यांचे संशोधनकार्य येथे सादर करतील आणि त्यावर चर्चाही करतील. याव्यतिरिक्त सिॲटच्या संकल्पनेवर विविध चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती विक्रम शिंदे यांनी दिली.