पिंपरी : वडीलोपार्जित संपत्तीच्या वादातून पोलीस अंमलदाराने पोलीस निरीक्षक बहिणीला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी भावा-बहिणीच्या कुटुंबीयांनी परस्परांविरोधात फिर्याद दिली आहे.पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या बहिणीने भावाविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> जेजुरीतील सोमवती यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा अपघात; अपघातात दोघांचा मृत्यू, १३ भाविक जखमी
काळेवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी याबाबत माहिती दिली. ‘पोलीस अंमलदार भाऊ आणि त्यांची पोलीस निरीक्षक बहीण व दुसरी बहीण यांच्यात वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू आहे. गेल्या शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलीस अंमलदार आपली पत्नी आणि मुलीसह पोलीस निरीक्षक बहिणीच्या घरी आला. बहिणीसोबत आईदेखील होती. त्या वेळी भावाने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. मीपण पोलीस आहे. मी तिला गोळ्या घालतो, काय होईल ते होईल, अशी धमकी त्याने बहिणीला उद्देशून दिली. तसेच, भावाची पत्नी आणि मुलीनेही त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पत्नी आणि मुलीला तुम्ही दोघींनी बहीण आणि आईला मारहाण केली नाही, तर मी फास लावून आत्महत्या करीन, अशी धमकी दिली,’ असे बहिणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा >>> पादचारी तरुणाला फरफटत नेणारे मोबाइल चोरटे अटकेत; हडपसर पोलिसांची कारवराई
तर, ‘पोलीस निरीक्षक बहिणीने फिर्यादी मुलीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. तसेच, दुसर्या बहिणीच्या मुलाने पोलीस अंमलदाराच्या मुलीचा विनयभंग केला,’ असे भावाच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.