पंजाबमधील काँग्रेसचे नेते आणि गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी त्यांच्या गावामध्ये ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या कटात पुण्यातील दोन गुन्हेगारांचा सहभाग असल्याचं पंजाब पोलिसांना संशय आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी त्यांची नावं आहे. संतोष हा पुणे जिल्ह्यातील मंचर तर सौरभ हा पुण्यातील नारायणगाव येथील असल्याची माहिती समोर येत आहे. 

नक्की वाचा >> पुणे : बलात्कार, हत्येचा प्रयत्न अन्…; मुसेवाला हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मंचरच्या संतोष जाधवचा क्राइम रेकॉर्ड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी संशयीत गुन्हेगार संतोषी जाधवच्या आईने संतोष हा मुसेवाला यांच्या खून प्रकरणात असल्यास त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्याची चूक पाठीशी घालण्यासारखी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याला चांगली संगत असलेले मित्र लाभले नाहीत म्हणून तो आज इथं पोहचला असल्याची खंत ही त्यांनी बोलून दाखवली आहे. मला आई म्हणू नकोस. मला कधीच फोन करू नकोस, शिक्षा भोगून आल्यास एक चांगला माणूस म्हणून जग,” असं भावनिक आवाहन त्यांनी संतोषला केलंय. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.

त्याला अडकवण्यासारखं वाटतं असल्याचंही म्हणाल्या
“संतोष हा मित्रांच्या संगतीमुळे आज त्या ठिकाणी पोहचला आहे. २२-२३ वर्षीय मुलाचं मन एवढं ही कठोर नसू शकतं की थेट जाऊन तो एखाद्याला मारू (खून) शकतो. त्याने खून नाहीच केला. त्याच या प्रकरणात नाव गोवण्यात आलंय,” असंही आपल्याला वाटत असल्याचं त्या म्हणाल्या.

नक्की वाचा >> विश्लेषण: मुसेवालांची हत्या AN-94 ने; जाणून घ्या मिनिटाला १८०० गोळ्या झाडणाऱ्या या रशियन रायफलचं चीन, पाकिस्तान कनेक्शन

मी स्वाभिमानाने, कष्ट करून जगणारी
“माझा मुलगा गुन्हेगार असेल ना तर त्याला वाटेल ती शिक्षा द्या. मी त्याला पाठीशी घालत नाही. हे मी मन कठोर करून बोलतेय. चूक केली असेल तर त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे. मी आतून खूप खचले आहे,” अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली खंत व्यक्त केली. “मी स्वाभिमानाने, कष्ट करून जगणारी महिला आहे. त्याला वाईट संगत लागली. त्याला हे कळायला हवं होतं,” असं त्या म्हणाल्या.

सासूने तक्रार केली आणि तो तुरुंगात केला
“त्याची पत्नी स्वतः हुन घरी आली होती. माझ्या मुलाने तिला पळवून आणलं नव्हतं. त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. त्यांचा संसार व्यवस्थित चालत असताना सासूने पोलिसात तक्रार दिली. त्यामुळं त्याला जेलमध्ये जावं लागलं. तो एक महिना येरवडा कारागृहात होता. गेल्या दोन वर्षे झालं तो इथं आलेला नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली. या सुरक्षेमध्ये कापत करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिलीय.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidhu moose wala death sharp shooter santosh jadhav says he should be punished if he is guilty kjp scsg
Show comments