पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याचा दावा केला जातोय. पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुरु असणाऱ्या पोलीस चौकशीत पुण्यातून दोघांना अटक करण्यात आलीय. मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याच्या वृत्तावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केलंय. मुसेवालांवर हल्ला करण्यासाठी आठ शार्प शूटर नेमकण्यात आले होते. त्यापैकी दोघे पुण्याचे असून त्यांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अटक करण्यात आलेल्या दोन शुटर्सची नावंही समोर आली असून दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण: मुसेवालांची हत्या AN-94 ने; जाणून घ्या मिनिटाला १८०० गोळ्या झाडणाऱ्या या रशियन रायफलचं चीन, पाकिस्तान कनेक्शन
पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावं समोर आल्यानंतर त्यांना पंजाब पोलिसांनी पुण्यामधील मंचरमधून ताब्यात घेतलंय. असं असतानाच आता यापैकी संतोष जाधव मंचरमध्ये वास्तव्यास होता अशी माहिती मंचर पोलिसांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना दिलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष जाधवविरोधात २०१९ मध्ये बलात्काराचा तर २०२१ मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी मोक्काअंतर्गतही त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.
२०१७ मध्ये संतोषविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंचर पोलिसांनी दिली आहे. संतोष जाधव हा मूळ मंचरचा नाही. तो इथं एकटाच राहात होता. त्याचा प्रेम विवाह झालेला असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहात नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे,
केवळ महाराष्ट्रातच नाही तर याच वर्षी राजस्थानमध्ये संतोष विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार या हत्येसाठी एएन-९४ ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. अशाप्रकारे पंजाबमधील गँगवॉरदरम्यान एएन-९४ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर २ मिनिटांमध्ये ३० गोळ्या झाडण्यात आल्या. समोर आलेल्या माहितीनुसार मुसेवाला यांच्या गावात हल्लेखोर पोहचले तेव्हा मुसेवालांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे एके-४७ बंदुका घेऊन असलेले कमांडो पाहून परतले. त्यानंतर त्यांनी कॅनडामधील गँगस्टर सतींदर सिंग उर्फ गोल्डी ब्रारकडून एएन-९४ रायफल मागवली. याच रायफलने मुसेवालांची हत्या करण्यात आली.
सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
सिद्धू मुसेवाला यांची रविवारी काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली. या सुरक्षेमध्ये कापत करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्चूनरही आहे. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.
सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिलीय.