राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सहा दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा दर्शविला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या घटनेनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्या राजकीय घडामोडीनंतर सर्वसामान्य नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून, त्याचदरम्यान पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरात एक सही संतापाची मोहीम हाती घेण्यात आली.
कसबा विधानसभा मतदारसंघातील शनिपार चौकात घेण्यात आलेल्या एक सही संतापाच्या मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही पक्षातील नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा दिसून येत नाही, अशा शब्दात पुणेकर नागरिकांनी राजकीय नेत्यांना सुनावले.
हेही वाचा – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील दुहेरी वाहतुकीचे आदेश रद्द
विनोद भट म्हणाले की, मागील काही महिन्यांत देशात आणि राज्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. आपण आज एकाला मतदान केले, पण चार वर्षांत कोण कोणासोबत गेले हे समजत नसून या राजकीय लोकांनी लोकशाहीची थट्टा केल्याचे यातून दिसत आहे. हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटत आहे.
एकमेकांवर खालच्या स्तरावर आरोप प्रत्यारोप करायचे आणि काही तासांत सत्तेसाठी त्यांच्याकडे जायचे. या सर्व घडामोडी पाहिल्यावर कोणत्याही पक्षातील नेत्यामध्ये पक्षनिष्ठा दिसून येत नाही, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. तसेच ते पुढे म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जाऊन अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले. पण एक गोष्ट नाकारता येत नाही. ती म्हणजे अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांना पडत्या काळात शरद पवार यांनी साथ दिली.
चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू : शशिकला गुरव
सध्या अंत्यत चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू असून सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. आजपर्यंत वाद घातले आणि आता एकत्र आले आहे. हे सर्व नागरिकांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपण नेत्यांच्या मागे जातो आणि ते नंतर एकत्रित येतात. आपल्यामध्ये कायमचा वाईटपणा येतो. या राजकीय घडामोडीमधून आता तरी शिकले पाहिजे, अशी फळ विक्रेत्या शशिकला गुरव यांनी मांडली.
हेही वाचा – माजी खासदार आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार?
लोकशाही जिवंत आहे की नाही, असंख्य तरुणांचा राजकीय नेत्यांना प्रश्न
मी आतपर्यंत दोन वेळेस मतदान केले आहे. पण सध्याची राजकीय घडामोड लक्षात घेता या पुढील काळात होणार्या निवडणुकीत मतदान करायचे की नाही, तसेच लोकशाही जिवंत आहे की नाही, हादेखील प्रश्न निर्माण झाला. त्याचबरोबर सद्य:स्थितीला कार्यकर्त्यांना तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहात विचारल्यावर तेदेखील सांगू शकत नाही, असा प्रश्न अनेक तरुणांनी यावेळी उपस्थित केला.