पुणे : मराठी चित्रपटाला चित्रपटगृहात प्राइम टाइम न मिळणे, प्रेक्षकांअभावी चित्रपट न दाखवणे अशा प्रकारांना पर्याय शोधण्यासाठी वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. पुण्यातील ‘द बॉक्स’ या प्रायोगिक नाट्यगृहात ‘या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटाचे चार दिवस रोज दोन या प्रमाणे खेळ आयोजित करण्यात आले असून, या निमित्ताने मराठी चित्रपट प्रदर्शनाची नवी वाट खुली होण्याची चिन्हे आहेत.

आर्थिकदृष्ट्या छोटा जीव असलेल्या मराठी चित्रपटाला, कलात्मक चित्रपटाला चित्रपटगृह मिळणे, चित्रपट चित्रपटगृहात टिकून राहणे आव्हानात्मक असते. कारण पहिल्या दोन दिवसांच्या प्रतिसादावर चित्रपटगृहचालक चित्रपट चित्रपटगृहात ठेवायचा की नाही हे ठरवतात. काही वेळा चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंग नसल्यास आयत्यावेळी चित्रपटाचे खेळ रद्द होतात. अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शनासाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करणे गरजेचे आहे. रंगकर्मी प्रदीप वैद्य यांनी त्यांच्या द बॉक्स या प्रायोगिक नाट्यगृह संकुलातील बॉक्स टू या नाट्यगृहात चित्रपट दाखवण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दोन खेळ होणार आहेत.

हेही वाचा…शहरी मतदार संघांमध्ये बनावट मतदान वाढले

आम्ही या पूर्वी ‘श्वास’, ‘नदी वाहते’ हे चित्रपट राज्यभरात ठिकठिकाणी जाऊन दाखवले होते, असे ‘या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक संदीप सावंत यांनी सांगितले. डॉ. सतीशकुमार पाटील, डॉ. अंजली पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नाट्यगृहात काही कार्यक्रम नसताना त्या मोकळ्या वेळेत चित्रपट दाखवणे शक्य आहे. त्यामुळे बॉक्स टू या जागेत चित्रपटांसाठी काही करण्याचा विचार होता. ‘या गोष्टीला नावच नाही’ या मराठी चित्रपटापासून त्याची सुरुवात करण्याचा विचार करून संदीप सावंत यांना विचारणा केली. त्याला त्यांनी, निर्मात्यांनी, वितरकांनी अनुकुलता दर्शवली. त्यामुळे हा चित्रपट चार दिवस दाखवला जाणार आहे. नाट्यगृहात चित्रपट दाखवल्यामुळे चित्रपटाला हक्काची जागा, हक्काची वेळ मिळू शकेल. या प्रयोगातून भविष्यात मराठी चित्रपटांसाठी नवी वाट निर्माण होऊ शकेल, असे प्रदीप वैद्य यांनी सांगितले.