पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची भरती केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अंशकालीन निदेशकांची नियुक्तीची प्रक्रिया, पदस्थापना, पदाचा कायम संवर्ग निर्माण करण्याच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली असून, अहवाल सादर करण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार सहावी ते आठवीचे वर्ग असलेल्या शंभरपेक्षा जास्त पटसंख्येच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशक कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि आरोग्य, कार्यानुभव या विषयांसाठी नेमण्याची तरतूद आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये अंशकालीन निदेशकांची पदे भरण्याबाबत धोरण निश्चित करणे, कायमस्वरुपी संवर्ग निर्माण करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. या अनुषंगाने उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आठ सदस्यांचा समावेश आहे.
हेही वाचा…पुण्यात झिकाचा धोका वाढला! एकूण रुग्णसंख्या ११ वर; गर्भवतींचे वाढते प्रमाण चिंताजनक
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग तयार करणे, अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या अटी-शर्ती ठरवणे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अंशकालीन पदावर नियुक्ती होण्यासाठी शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करणे, अंशकालीन निदेशकांचे मानधन निश्चित करणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.