गिर्यारोहकांपुढील नवनवी आव्हाने, ल्होत्सेवरील विजय, एव्हरेस्टच्या वाटेवरील बिघडलेले वातावरण, यातून तिघांनी गाठलेले शिखर आणि याचा जल्लोष सुरु असतानाच समजलेला उमेश झिरपे यांचा त्याग या साऱ्या घटना-प्रसंगांनी ‘गिरिप्रेमी’च्या कार्यालयाने कालपासून ताण-तणाव ते जल्लोषापर्यंत असे विविध रंग अनुभवले.
शहरातील आपटे रस्त्यावर ‘गिरिप्रेमी’चे कार्यालय आहे. ‘एव्हरेस्ट’ आणि ‘ल्होत्से’ या एकाचवेळी दोन शिखरांच्या मोहिमेच्या निमित्ताने बुधवारपासूनच या कार्यालयात बैठका, हितचिंतकांची ये-जा सुरू झाली होती. निरंजन पळसुले, अविनाश कांदेकर आणि रुपेश खोपडे हे तिघे या कार्यालयातून गेले अनेक दिवस या मोहिमेचे समन्वयाचे काम पाहात आहेत. मोहिमेसाठी आवश्यक माहिती देणे, हवामानाचे अंदाज पुरवणे इथपासून ते मोहिमेची नित्य घडामोडींची माहिती गिर्यारोहकांच्या नातेवाईकांपासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे तिघे सांभाळत आहेत.
सुरुवातीला संस्थेच्या बैठका, त्यानंतर प्रत्यक्ष मोहीम सुरु झाल्यानंतरची धावपळ यांनी हे कार्यालय भारून गेले होते. यातच तो अंतिम चढाईचा दिवस उजाडल्यावर तर याला अनोखे रूप आले. ल्होत्सेची मोहीम वेळापत्रकाप्रमाणे सुरू झाली, पण ‘एव्हरेस्ट’ला वेगवान वाऱ्याचा अडथळा निर्माण झाला आणि इकडे ‘गिरिप्रेमी’च्या कार्यालयात उपस्थितांना चिंता पोखरू लागली. रात्रभर अनेक कार्यकर्ते या कार्यालयात बसून होते. पण शेवटपर्यंत संपर्क झालाच नाही. गुरुवारी पहाटे निरोप आला तो मोहिमेच्या माघारीचाच!
निराशेचे हे मळभ गुरुवारच्या सकाळवर पसरत असतानाच आशीष मानेने ल्होत्से सर केल्याची बातमी आली आणि कार्यालयात एकच जल्लोष झाला. पहिला डाव तर जिंकला, आता साऱ्यांचे लक्ष ‘एव्हरेस्ट’कडे लागले. दिवसभर अनेक जण कार्यालयात या विषयीच चर्चा करत होते. अधेमध्ये ‘बेसकॅ म्प’हून येणाऱ्या अजित ताटेंच्या दूरध्वनीमुळे परिस्थितीचा अंदाज येत होता.
गुरुवारी संध्याकाळी हितचिंतकांनी पुन्हा गर्दी केली. गणपतीची आरती झाली, गिर्यारोहकांच्या सुरक्षेबरोबर बिघडलेल्या हवामानाचे संकट दूर करण्याचे मागणे सगळय़ांनीच मागितले. रात्रीचे नऊ वाजले आणि ताटेंचा दूरध्वनी आला, ‘मोहीम सुरू झाली.’ पुढची सारी रात्र मग बाल्कनी, हिलरी स्टेप अशा वेगवेगळय़ा टप्प्यांवरील प्रगतीचा आलेख मांडणारी गेली. भल्या पहाटे ‘शिखरमाथा’ जवळ येताच इकडे दूरध्वनी, मेसेज सुरू झाले. साडेआठपर्यंत सारे कार्यालय पुन्हा भरून गेले आणि ताटेंचा तो दूरध्वनी आला, ‘..आज सकाळी आठ वाजता गणेश, आनंद आणि भूषण यांचे समीट झाले आहे.’ त्यांच्या या निरोपाबरोबर कार्यालयात एकच जल्लोष झाला. एकमेकांना टाळ्या,अभिनंदन सुरू झाले. पण या यादीत उमेशचे नाव नसल्याने त्याची विचारणा सुरू झाली आणि मग ‘ऑक्सिजन सिलिंडर’च्या उणिवेची ती दुर्दैवी व्यथा बाहेर आली. साऱ्या आनंदावर जणू विरजण पडले. जल्लोषात बुडालेले कार्यालय जणू पुन्हा शांत-दु:खी झाले.
पुढे दिवस सुरू झाला तो असाच अभिनंदन करणारा – दु:ख गाळणारा. शेवटी ज्याच्यामुळे ही सल या कार्यालयाला लागून राहिली त्याचाच संध्याकाळी दूरध्वनी आला, ‘हा आनंदाचा दिवस आहे, माझे २०१२ साली अपुरे राहिलेले स्वप्न आज खऱ्याअर्थाने पूर्ण झाले आहे. जल्लोष करा, दु:ख करू नका!’ उमेशच्या या एका वाक्याबरोबर सारेच भावूक झाले. पण त्याच्या बोलण्यानंतरच वातावरण काहीसे हलके, मोकळेही बनले. मग त्याच्याच साक्षीने ‘एव्हरेस्ट’ विजयाचा आनंद पुन्हा झाला, लगोलग पेढय़ांचे वाटपही सुरू झाले.
शांतता, तणाव आणि जल्लोष!
‘गिरिप्रेमी’च्या कार्यालयाने कालपासून ताण-तणाव ते जल्लोषापर्यंत असे विविध रंग अनुभवले.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 18-05-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silence tension and jubilation at giripremi