लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : ताथवडे आणि मारुंजी परिसरातील हवेचे प्रदूषण वाढले असून, जड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पीएमआरडीएचे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील ५० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी, तसेच हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामाला असलेले आणि या परिसरात राहणारे अभियंते येत्या शनिवारी (८ मार्च) मूक मोर्चा काढणार आहेत.
ताथवडे – वाकड येथील ताकभाते कॉर्नरजवळील कोहिनूर कोर्टयार्ड सोसायटीपासून सकाळी आठ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. कोहिनूर कोर्टयार्ड सोसायटी, एलिट होम्स सोसायटी, झेनिथ सोसायटी, ईशा फूटप्रिंट, शनी मंदिर, इंदिरा स्कूल रस्ता, ताकभाते कॉर्नरमार्गे पुढे वाकडकर कॉर्नर येथे त्याची सांगता होणार असल्याचे आंदाेलनाचे आयोजक प्रशांत काटे यांनी सांगितले.
शनी मंदिर, इंदिरा स्कूल रस्ता भागातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सिमेंटमिश्रित धूळ साचल्यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. श्वसनाचे विकार, डोळ्यांचे त्रास आणि त्वचारोग वाढले आहेत. रस्त्यांची स्वच्छता न राखल्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे.
या परिसरात २० मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सात हजार नागरिक राहतात. प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात चार शाळा असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची वाहतूक होत असल्याने वाहनांमधून रस्त्यावर खडी व सिमेंट पडते. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असल्याकडे काटे म्हणाले.
नागरिकांच्या मागण्या
- दररोज रस्त्यांची दोन वेळा नियमितपणे यंत्राद्वारे पाण्याच्या साहाय्याने साफसफाई करावी
- धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘वॉटर स्प्रे’ प्रणाली बसवावी
- सार्वजनिक स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात
- रस्त्यांवरील खडी आणि सिमेंट गळती रोखण्यासाठी वाहतूकदारांवर जबाबदारी निश्चित करावी
- श्वसनाच्या समस्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी
- शनी मंदिर ते मारुंजी रस्त्याच्या दुतर्फा झाडांची योग्य निगा राखली जावी