भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मूक आंदोलन करण्यात आले. पैठण येथे संतपीठाच्या कार्यक्रमात पाटील यांनी ‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रक्रिया उमटत आहेत.
विरोधकांकडून पाटील यांच्या विधानावर आक्षेप घेऊन टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्टुडंट हेल्पिंग हँडतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. उच्च आणि तंत्रशिक्षण सारख्या शिक्षणाशी संबंधित महत्वाच्या खात्यावर मंत्री म्हणून काम करण्याचा अधिकार चंद्रकांत पाटील यांनी गमावला आहे, त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन संघ, भाजपासाठी भीक मागायच्या कामगिरीवर पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून रुजू व्हावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ता हनुमंत पवार यांनी सांगितले.