पुणे: घटनेचे वार्तांकन करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराला अटक करण्याची मागणी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी मूक निदर्शने करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांना सुबुद्धी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, बंडू तांबे, कार्तिक साठे, नीता कुलकर्णी, बाळासाहेब आहेर यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या, असे अवमानकारक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकंमत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पाटील यांच्या मागणीनंतर संबंधित पत्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
हेही वाचा >>> पुणे: शहरात रिक्षा बंदमुळे प्रवाशांची गैरसोय रिक्षा चालकांचा आरटीओवर मार्चा
राज्याच्या एका मंत्र्याने पोलिसांवर दबाव आणल्याचा प्रकार चुकीचा आहे. पत्रकारांवर दडपशाही करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपच्या या फासिस्ट विचारांमुळे पुढील काळात पत्रकारांना निरपेक्ष वार्तांकन करतानाही दबाव सहन करावा लागेल. पत्रकारांना बळ देऊन लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायम प्रयत्नशील आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.