पुणे: पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यभरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे २ हजार ७४२ रुग्ण सापडले असून, मागील वर्षी त्या तुलनेत त्यात एक हजारहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यभरात जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. पावसाळा संपताना सप्टेंबर महिन्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढू लागतील, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २१ जुलैपर्यंत डेंग्यूचे २ हजार ७४२ रुग्ण आढळले. यावर्षी एकाही डेंग्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. मागील वर्षी जुलैअखेरीस १ हजार ९८१ रुग्ण सापडले होते तर ६ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. याचबरोबर चिकुनगुनियाचे यंदा २१ जुलैपर्यंत ३२५ रुग्ण सापडले आहेत. मागील वर्षी जुलैअखेरीस ही संख्या ४९३ होती.

हेही वाचा… Rain Weather Update : ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कसा असेल? हवामान विभाग काय म्हणतो जाणून घ्या…

या वर्षी २१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात डेंग्यूचे ४३ आणि महापालिकेच्या हद्दीत ३३ रुग्ण सापडले आहेत. राज्यात बृहन्मुंबई महापालिकेत सर्वाधिक ९७३ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नाशिक महापालिका १३९, सांगली महापालिका १००, सोलापूर महापालिका ५८, कोल्हापूर महापालिका ५८, नागपूर महापालिका ५२, ठाणे महापालिका ४७, औरंगाबाद महापालिका ४१, कल्याण महापालिका २० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात डेंग्यूची रुग्णसंख्या पालघर जिल्ह्यात सर्वाधिक १९१ आहे. त्याखालोखाल कोल्हापूर १६५, सोलापूर ५५, रत्नागिरी ५१, नांदेड ५१ आणि अहमदनगर जिल्ह्यात ४३ अशी आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा साथरोगांचा असतो. या काळात साथरोगांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. याचबरोबर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. – डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य सेवा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Since the onset of monsoon the incidence of epidemics such as dengue has started to increase across the maharashtra pune print news stj 05 dvr
Show comments